कासा (ठाणे) : डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्या चळणी, सायवन, दाभाडी, किन्हवली या आश्रमशाळांना अन्नपुरवठा करणार्या वाहनाचा कासा पोलीस ठाणे हद्दीत बापू गावाजवळ अपघात झाल्याची घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, एका भरधाव वेगाने येणार्या वाहनाने अन्नपुरवठा करणार्या गाडीला धडक दिल्याने ती पलटी झाली.
अपघाताच्या कारणांमध्ये अवजड वाहतुकीचा समावेश असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भागातील रस्त्यांवर अवैध वाहतूक सर्रास सुरू असून त्यामुळेच अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाणे अंतर्गत सुरू असून पुढील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
या वाहनात तीन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाचे डबे होते. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अपघातामुळे अन्न रस्त्यावर विखुरले. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळण्यास अडचण निर्माण झाली. या परिस्थितीत तत्काळ दुसर्या वाहनाद्वारे अन्नपुरवठा केला गेला, अशी माहिती डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी शाळांमध्येच स्वयंपाक केला जात होता. मात्र, सध्या एका खाजगी कंपनीमार्फत तयार अन्न 40-50 किलोमीटर अंतरावरून वाहून आणले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थंड व शिळे अन्न दिले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी मागणी केली आहे की, शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच स्वयंपाकाच्या सुविधा उपलब्ध करून गरमागरम अन्न दिले जावे. पावसाळ्यात अशा आपत्तींचा सामना करावा लागू नये यासाठी शाळांमध्येच भोजनालय सुरू करावे असे पालकांनी सांगितले.