यावेळी लोकदरबारात रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. तसेच उत्तन, पाली, चौक, डोंगरीचा सिटी सर्व्हे करण्याची मागणी केली. Pudhari News Network
ठाणे

Thane | उत्तनमध्ये अत्याधुनिक जेट्टी उभारणार

निधी उपलब्ध करून देण्याची परिवहन मंत्र्यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मासेमारी नौका या मिरा-भाईंदरमधील उत्तनमध्ये असल्यामुळे तेथे एक चांगली अत्याधुनिक जेट्टी उभारणे आवश्यक असून त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

उत्तनच्या संत मदर तेरेसा सभागृहात शुक्रवारी (दि.14) आयोजित खास लोक दरबारमध्ये ते बोलत होते. या लोक दरबारात उत्तनमधील रहिवाशांनी आपल्या समस्या परिवहन मंत्र्यांसमोर मांडल्या. त्यांनी येथील उत्तन, पाली, चौक, डोंगरी या चार गावांचा सिटी सर्व्हे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. त्यावर परिवहन मंत्र्यांनी जिल्हा भूमापन अधिकार्‍यांना तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. तसेच धावगी-डोंगर येथील डम्पिंग ग्राऊंडमधील कचरा कमी करणे, खाडीत वाहून येणार्‍या सांडपाण्याचा निचरा करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात परिवहन मंत्र्यांनी कचर्‍यावरील विविध प्रकारच्या प्रक्रियेसाठी शासनाकडून 142 कोटींचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगून त्यातून टॅगो वाहन खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वाहनाद्वारे सुमारे 150 टन ओल्या कचर्‍यावर ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी प्रक्रिया होऊन त्यापासून खत निर्मिती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे उत्तनच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये हा कचरा आणला जाणार नसल्याने डम्पिंग ग्राउंडमधील कचर्‍याचे दैनंदिन प्रमाण कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मासेमारी बंदीच्या कालावधीत 1 जून ते 31 जुलै ऐवजी 7 जून ते 10 ऑगस्ट असा बदल करण्याची मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली. पालिकेकडून नवीखाडीतील तिवरांच्या झाडांमुळे त्याची साफसफाई केली जात नसल्याने त्यात मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यातून दुर्गंधी सुटते. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून खाडीची नियमितपणे साफसफाई करण्यात यावी. तसेच खाडीपात्रात झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले.

या लोक दरबारात मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, शहर अभियंता दीपक खांबित, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे, उपायुक्त सचिन बांगर, एमएमआरडीएचे अतिरिक्त राधा बिनोद शर्मा, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील, पतन व्यवस्थापन अभियंता सुरेखा पवार, माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा, उत्तन कोळी जमातीचे प्रा. संदीप बुरकेन, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी नगरसेवक विक्रम सिंह, बर्नड डिमेलो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी आदी यावेळी उपस्थित होते.

बीकेसीच्या धर्तीवर पॉड टॅक्सी सुरू करणार

मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर मिरा-भाईंदरमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून पॉड टॅक्सी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही पॉड टॅक्सी ज्या ठिकाणी मेट्रोची सुविधा नाहीत, अशा ठिकाणच्या प्रवाशांकरिता सुरू केली जाणार असून ती मेट्रोला जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला एमएमआरडीएच्या तत्कालीन बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT