वालशिंद गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या वी लॉजीस या जंबो गोदाम संकुलास आग लागली. pudhari news network
ठाणे

ठाणे : भिवंडीत गोदामास भीषण आग

Bhiwandi fire incident : महामार्गालगतच्या गोदामातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी; कोट्यवधींचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या वी लॉजीस या जंबो गोदाम संकुलास शनिवार (दि.5) मध्यरात्री आग लागण्याची घटना घडली आहे.

या संपूर्ण गोदाम संकुलास समोरून २० शटर जरी असले तरी सुद्धा हे संपूर्ण गोदाम आतून एकत्रित असल्यामुळे ही आग पाहता पाहता संपूर्ण गोदामामध्ये पसरली. ज्यामुळे या गोदामात साठवलेले ऑइल, कापड, प्लास्टिक साहित्य तसेच केमिकल हे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दरम्यान केमिकलचे मोठमोठे स्फोट पहाटेच्या सुमारास या ठिकाणी होत होते. या आगीची माहिती मिळताच भिवंडी व कल्याण, ठाणे व सकाळी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे एक एक वाहन या ठिकाणी दाखल झाले.

दरम्यान गोदामात आगीची घटना घडल्यानंतर या ठिकाणी त्वरित पाण्याची उपलब्धता होऊ न शकल्यामुळे ही आग भडकत होती. या आगीमध्ये जंबो गोदामाच्या छतासह संपूर्ण स्ट्रक्चर कोसळून खाली पडल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचण येत होती.

१२ तासांनी आग आटोक्यात

नवी मुंबई येथील अग्निशमन दलाच्या गाडीवरील क्रेनने गोदामातील आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान आग मध्यरात्रीच्या सुमारास लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून ही आग तब्बल १२ तासांनी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT