मोठागाव रेतीबंदर फाटक pudhari news network
ठाणे

ठाणे : मोठागावच्या रेल्वे फाटकावर उभारणार पूल

अंजली राऊत

डोंबिवली : मुंबई-ठाण्याला जोडणार्‍या पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलाचा महत्वाचा दुवा मानल्या जाणार्‍या मोठागावच्या रेतीबंदर फाटकावर रेल्वेकडून बांधण्यात येणार्‍या उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यात शेकडो रहिवासी बाधित होणार आहेत.

रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणार्‍या बाधितांच्या जमिनी आणि इमल्यांचे भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या कामासाठी महसूल विभागाकडून करयोग्य मुल्यांकन करण्यात आले आहे. तसा 84 कोटी 12 लाख 68 हजार 588 रूपयांचा प्रारूप प्रस्ताव तयार केला आहे. महसूल विभाग आणि रेल्वे बोर्डाने हे प्रस्ताव अंतीम केल्यानंतर रस्ते बाधितांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मोठागाव-माणकोली उड्डाण पुलाकडून डोंबिवलीत येण्यासाठी मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे भागात पोहोच रस्ता आणि रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाचे काम प्रस्तावित आहे. रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल बांधणीचे काम डीएफसीसी अर्थात समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मंडळाकडून केले जाणार आहे. रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाची उभारणी झाल्यानंतर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला पुलाचे पोहोच उतार रस्ते असणार आहेत. या पोहोच रस्त्यांच्या मार्गिकेत इमारती, व्यापारी गाळे आणि बैठ्या चाळी आहेत. या बाधितांना शासकीय मूल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळाल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या भूसंपादनासह त्यांची बांधकामे हटविणे केडीएमसी प्रशासनाला शक्य होणार आहे.

मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन, मूल्यांकनासाठी महसूल विभागाला प्रस्ताव दिला आहे. या विभागाने या संदर्भात बहुतांशी प्रक्रिया सुरू केल्या.
मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता

रेतीबंदर रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहोच रस्त्यावरील बाधित बांधकामे, भूसंपादन, तसेच बाधितांची पुनर्स्थापना या सर्व प्रक्रियांसाठी महसूल विभागाने भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा अधिनियम 2013 मधील कलम 23 अन्वये प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे मौज नवागाव या महसुली हद्दीतील भूसंपादन, पुनर्वसन कामासाठी 2 कोटी 92 लाख 50 हजार 560 रुपये, मौजे ठाकुर्ली येथील भूसंपादन कामासाठी 81 कोटी 20 लाख 18 हजार 28 रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी म्हणून मोठागावच्या रेतीबंदर रोडवरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात बाधित झालेल्या रहिवाशांना मोबदला मिळणार आहे.

मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. बहुतांशी भूसंपादन पूर्ण झाले आहे. तरी काही जमिनींवर बांधकामे आहेत. त्यांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणे बाकी आहे. बाधितांच्या भरपाईचा एकत्रित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडून मंजूर होऊन आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडल्या जातील.
विश्वास गुजर, उपविभागीय अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT