ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ठाण्यातही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये नागरिकांचे वास्तव्य असून अशा इमारतीमध्ये अजूनही तब्बल 80 हजार कुटुंबे राहत आहेत. एकदा राहते घर सोडले की हक्काचा निवारा गमावून बसण्याच्या भीतीपोटी रहिवाशी इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.
विरारच्या घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणेकरांवर देखील मृत्यूची टांगती तलवार कायम असून 3 लाख 27 हजार 290 ठाणेकरांचा मुक्काम मृत्यूच्या छायेत आहेत. ठाणे पालिका हद्दीत जवळपास 93 इमारती अति धोकादायक तर 200 धोकादायक आहेत.
ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक, अतिधोकादायक आणि बेकायदा इमारतींचा प्रश्न लटकलेला आहे. अशातच शहरातील शेकडो धोकादायक इमारतीमध्ये लाखो ठाणेकर जीव मुठीत घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत. एकीकडे क्लस्टर योजनेचे स्वप्न दाखवण्यात आले असताना मात्र अद्याप क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हक्काचे घर मिळेल या आशेने इमारतीमध्ये राहणार्या नागरिकांमध्ये धडकी भरत आहे.
विरारप्रमाणेच धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार याआधी ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार 9 प्रभाग समितीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीची यादी पालिकेने आज जाहीर केली आहे. नौपाडा कोपरी प्रभाग समितीहद्दीत 55 म्हणजेच सर्वात जास्त धोकादायक इमारती होत्या. त्यापैकी 27 इमारतींमध्ये कुटुंबे राहत आहेत.
प्रशासनाची भूमिका काय?
धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन झाले नाही. धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या नागरिकांबाबत ठाणे महापालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.