ठाणे : कलकत्ता येथून मुंबई-ठाण्यात विक्री करण्यासाठी आणलेले पाच किलो चरस ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने माजीवडा येथे पकडले. या चरसची तस्करी करणाऱ्या एकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या चरसची किंमत 5 कोटी 50 हजार रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. दरम्यान, अटकेतल्या तस्कराचे नेपाळ कनेक्शन समोर आले असून त्याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील माजीवडा येथे एक जण चरस अमली पदार्थ घेऊन येणार असून तो त्याच्या साथीदारांसह हा चरस ठाण्यात विक्री करणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच युनिट पाचच्या पथकाने माजीवडा परिसरात सापळा लावला.
यावेळी शनवर अनवर अली (38, कलकत्ता, पश्चिम बंगाल) या संशयीत व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्या जवळ 5 किलो 50 ग्रॅम चरस हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थ तस्करास अटक करीत त्यांच्याकडील चरस, मोबाईल फोन असा एकूण 5 कोटी 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, अटकेतल्या आरोपीच्या चौकशीतून तो नेपाळच्या काही ड्रग्ज तस्करांचा संपर्कात असल्याचे समोर आले असून त्याने हे ड्रग्ज नेपाळ येथून कलकत्ता मार्गे ठाण्यात आणले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या आरोपीने या पूर्वी देखील चरसची तस्करी केली आहे का व तो कोणाला हे अमली पदार्थ विकणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नववर्ष स्वागतापूर्वीच मोठ्या रेव्ह पार्टीची ठाण्यात तयारी?
नववर्ष स्वागतापूर्वी तसेच डिसेंबर महिन्यात विविध पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेकदा पोलिसांची नजर चुकवून रेव्ह पार्ट्या देखील आयोजित केल्या जातात. या पार्ट्या रोखण्यासाठी आणि अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने आता कारवाईला सुरुवात केली आहे.