ठाणे : दिवा येथे ठाणे पालिकेच्या शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना थोड्याच वेळात ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच कळव्यातील एका खाजगी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असताना गुरुवारी असाच धक्कायक प्रकार दिव्यातील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मध्ये घडला आहे. या शाळेतील ४० मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात आलेली खिचडी खाऊन उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेत डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सध्या मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारांसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा होण्याचा दुसऱ्यांदा प्रकार घडला असल्याने पोषण आहारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
सरकारी आणि खासगी शाळेतील विदयार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. मात्र हा आहारच आता या मुलांच्या जीवावर उठला आहे. काही दिवसांपूर्वीच कळव्यातील सहकार विद्यालयातील ४० आमटी आणि भात खाऊन अशाच प्रकारची विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. तोच प्रकार आता ठाणे महापालिकेच्या दिव्यातील शाळा क्रमांक ८८ मध्ये घडला आहे. आगासन गावातील या शाळेत दुपारी मुलांना पोषण आहारातून खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४० मुलांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. काहींना उलट्यांचा त्रास देखील झाला. याची तात्काळ सूचना ही महापालिकेच्या अधिकाऱ्याने देण्यात आली.महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली आणि मुलांवर प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. तर पुढच्या उपचारांसाठी सर्व मुलांना पालिकेच्या कळवा रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत असल्याचा प्रकार समोर आला असल्याचा आरोप उबाठा पक्षाचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केला आहे. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही.मुलांना देण्यात आलेल्या खिचडीमध्ये पाल असल्याचे आढळून आले असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे. अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.