ठाणे: कमी पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील काही भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
त्यामुळे मुंब्रा, दिवा, कळवा, वागळे आणि मानपाडा प्रभाग समित्यांमधील काही भागांचा पाणीपुरवठा तब्बल ३६ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
यंदा कमी झालेला पाऊस, अल निनोचा प्रभाव आणि मान्सूनने लवकर घेतलेली माघार यामुळे पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार १० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा निर्धारित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊनचा सर्वाधिक परिणाम दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील पाणीपुरवठा्यावर होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता उर्वरित संबंधित भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच कळवा प्रभाग समितीच्या हद्दीतील सर्व संबंधित भागांत पाणी मिळणार नाही.
याशिवाय वागळे प्रभाग समितीअंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २ आणि नेहरूनगर, तर मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन
३६ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी गुरुवारपासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.