अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट बघणार्या ठाणे महापालिकेने शीळ परिसरातील 21 इमारतींवर कारवाई केली असली तरी, ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षात तब्बल 358 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक दिव्यात 223 तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्तकनगर परिसरात 60 अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असताना प्रशासनाच्या डोळ्यादेखत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणाच्या आशीर्वादाने या अनधिकृत इमारती अजूनही उभ्या राहत आहेत याची चौकशी महापालिका आयुक्त करणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
चौदा वर्षांपूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळफाटा परिसरात अनधिकृत इमारत कोसळून 74 रहिवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला होता. यामध्ये विकासक, काही पालिका अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच न्यायालयात खटला चालवण्यात आला. या घटनेमुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता. मात्र त्यानंतरही एवढ्या वर्षात ठाण्यात आणि विशेष करून खाडीच्या पलिकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात बेकायदा बांधकामे थांबलेली नाहीत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शीळ परिसरातील एम. के. कंपाउंडमधील 21 इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली असली तरी, गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात बेसुमार बेकायदा बांधकामे झालेली आहेत.
गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात 358 बेकायदा बांधकामे उभी राहिली असून बेकायदा बांधकामाचा हा आकडा पालिकेचा असला तरी, यापेक्षा अधिक बेकायदा बांधकामे ठाण्यात उभी राहिली आहेत.
अनेक इमारतींमध्ये तर नागरिक देखील राहायला गेले असून अशा नागरिकांनी व्याप्त असलेल्या इमारतींवर कारवाई करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वर्तकनगर भागात 60 इमारती उभ्या राहिल्या असून मुंब्रा आणि दिवा अशा मिळून 262 बेकायदा इमारती या उभ्या राहिल्या आहेत.
आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असली तरी प्रशासनाच्या डोळ्यादेखत कोणाच्या तरी आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट का बघावी लागते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बेकायदा बांधकामे करणार्या भूमाफियांनी शहरातील ग्रीन झोन देखील सोडले नसून ग्रीन झोनमध्येही काही ठिकाणी बेकायदा बांधकामे झालेली आहेत. ग्रीन झोनमध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, ती ठिकाणे शोधून कारवाई करण्याचे आदेशही आता उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता ग्रीन झोनमध्ये झालेली कामे शोधून त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केलेली आहेत.
शीळ परिसरातील 21 अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने कारवाई केली असून यामध्ये 18 इमारती महापालिकेने पाडल्या आहेत. तर उर्वरित 3 इमारतींवर कारवाई करणे शिल्लक आहे.
या इमारती पाडण्यासाठी मोठ मोठ्या मशीनचा वापर करण्यात आला असून याचा खर्च जवळपास साडेचार कोटींच्या घरात जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम. के. कम्पाऊंडमधील 18 इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात, 19 जूनपासून नियमित अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे.
वर्तकनगर, दिवा, मुंब्र्यात प्रशासन हतबल... : बेकायदा इमारतींपैकी सर्वाधिक इमारती या वर्तकनगर, मुंब्रा आणि दिवा परिसरात आहेत. तीनही प्रभाग समिती क्षेत्रातील बेकायदा बांधकामाची संख्या ही 322 असून तीनही प्रभाग समितीमधील केवळ 57 इमारतींवर कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी कारवाई करताना प्रशासनावर कोणाचा दबाव आहे की काय? असा संशय निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत 124 इमारतींवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. तर दिव्यातील 21 इमारतींपैकी 18 इमारतींवर कारवाई केली असून उर्वरित 3 इमारतींवर कारवाई प्रस्तावित आहे. नागरिकांनी संपूर्ण खात्री करूनच घर घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.रवींद्र मांजरेकर, जनसंपर्क अधिकारी, ठा.म.पा