डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपालाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्थांसह सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी (दि.13) डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हभप संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या मेळाव्यात संस्था, संघटना आणि मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले. माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण 'आगे बढो...हम तुम्हारे साथ है...'चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.
भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची असल्याची भावनिक साद मंत्री चव्हाण यांनी घातली. या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हात उंचावून समर्थन दिले. विशेष म्हणजे या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
भाजपाच्या 143 विधानसभा मतदारसंघाची रविवारी (दि.13) प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याला तब्बल 4 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, मंदार टावरे, साई शेलार, शशिकांत कांबळे, नंदू परब, विनोद काळण, राजन आभाळे, समीर चिटणीस, विश्वदिप पवार, राजू शेख, निलेश म्हात्रे, पूनम पाटील, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूकीला कसे काम करावे ? प्रचार प्रसार कसा करावा ? मतदारांपर्यंत काय मुद्दे न्यावेत ? या संदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला होता.