अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे मोदी यांच्या दौऱ्यामुळे ठाणेकरांचे हाल  (छाया : प्रवीण सोनावणे)
ठाणे

ठाणे : मोदींच्या कार्यक्रमासाठी ठाणे परिवहनच्या २५० बस वळविण्यात आल्या

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील कासारवडवली येथील कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांना घेऊन जाण्यासाठी ठाणे परिवहनच्या सुमारे २५० पेक्षा जास्त बसेस वळवण्यात आल्याने सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले आहेत. रस्यावर केवळ १५० बसेसच धावत असल्याने ठाणे स्टेशन परिसरातील सॅटिस पुलावर बसच्या प्रतीक्षेत सकाळच्या वेळेस नागरिकांची तुफान गर्दी झाली. बसची वाट बघत नागरिकांच्या अक्षरशः लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. खाजगी वाहतूक व्यवस्था परवडत नसल्याने केवळ ठाणे परिवहन सेवेवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांकडून मात्र टीएमटी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

ठाणे शहरातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स देखील लावण्यात आले आहेत . पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या असून खास करून सभेच्या ठिकाणी विशेष करून महिलांची गर्दी व्हावी यासाठी या महिलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे परिवहन सेवेच्या तब्बल २५० पेक्षा जास्त बसेस या कार्यक्रमाच्या ठिकाणी वळवण्यात आल्या आहेत.

अचानक १५० बसेस रस्त्यावर धावण्याच्या कमी झाल्याने याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना चांगलाच बसला. संपूर्ण ठाणे शहरात केवळ १५० बसेसच धावत असल्याने ठाणे स्थानकातील सॅटिस पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तासंतास बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या सॅटिसवर लांबच्या लांब रांगा लागल्या. मोदींच्या कार्यक्रमासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था का करण्यात आली नाही? सर्वसामान्य प्रवाशांचे हाल का ? असा संताप प्रवाशांकडून यावेळी परीवहन प्रशासनाच्या विरोधात व्यक्त करण्यात आला.

ठाणे परिवहन सेवेतून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी परिवहन सेवा ही लाईफलाईन मानली जाते. दररोज ३५० बसेस रस्त्यावर धावत असतात. या सर्व बसेस सॅटिसवरूनच शहराच्या विविध भागात जातात. मात्र शनिवारी केवळ १५० बसेसच रस्यावर धावल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अक्षरशः तारांबळ उडाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT