डोळखांब : दिनेश कांबळे
शहापुर तालुक्यातील ग्रामिण भागात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यावर्षी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागा कडून पंधरा कोटी रूपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे.
शहापुर तालुक्यात 110 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर धरणांचा तालुका म्हणून शासन दरबारी शहापुरची वेगळी ओळख आहे. सन- 2011 चे जनगणनेनुसार 3 लाख 34 हजार येवढी तालुक्याची लोकसंख्या आहे. परंतु सन-2004 पासुन ते सन 2024 या विस वर्षाच्या कालखंडात शहापुर तालुक्याचे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल यांसारख्या दोनशे पाणी योजनांवर करोडो रूपये खर्च होवुन ही या योजना कागदावरच पुर्ण झाल्याचे चित्र पहायला मिळते.
नव्याने सुरू असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या जल जिवन मिशन च्या 189 पाणी योजनांची कामे मुदत संपुनही पुर्ण झालेली पहायला मिळत नाहीत. अजुनही या योजनेतील पाईप लाईन टाकणे,चर्या खोदणे, टाक्या बांधणे आदी कामे पुर्णत अपुर्ण असतांना मुल्यांकना पेक्षा जास्त निधी या योजनांवर खर्च झाला मात्र परिस्थिती आजही जैसे थे आहे. या सर्व योजनांच्या बोगस कामांमुळे शहापुर तालुक्यातील पाणी टंचांईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यावर गेली विस वर्ष प्रत्येक वर्षी पंधरा ते विस कोटींचा आराखडा तयार करावा लागत आहे. यावर्षी म्हणजे सन 2024 -25 या आर्थिक वर्षा करीता शहापुर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागा कडुन पंधरा कोटी रूपयांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असुन सदर आराखडा तहसिलदार परमेश्वर कासोळे यांचे सहीसाठी नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या विस वर्षांचा हिशोब केला तर टंचाईवर अंदाजे तिनशे कोटी रूपये खर्च झाल्याचे लक्षात येते. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजना तयार करने, दुरूस्ती करने, विंधन विहीर तयार करणे आदी कामांचा समावेश होतो.
भातसा, वैतरणा, तानसा यांसारखी मोठाली जलाशय तालुक्यात असतांना देखील या जलाशयातील पाण्याचा हवा तेवढा उपयोग तालुक्याला होत नाही. याकरीता येथील पाण्याचे दरवर्षी योग्य नियोजन करने किंवा तालुक्यासाठी स्वतंत्र जलाशय तयार करने गरजेचे आहे. तरच तालुक्यातील पाणी टंचाई कायम निकाली निघणार आहे.
गेली विस वर्ष टंचाईवर तिनशे कोटी, जलस्वराज्य दोनशे योजनांवर झालेला करोडो रूपयांचा खर्च आणी जल जिवनच्या 189 योजनांवर झालेला करोडो रूपयांचा खर्च विचारात घेतला तर तालुक्याची पाणीटंचाई निकाली निघणे गरजेचे होते.मात्र प्रत्यक्षात ही कामे झाली नसल्याने टंचाई आज देखील कायम आहे.त्याचप्रमाणे तालुक्यात पाटबंधारे विभाग,जलसंधारण, वनविभाग खात्यामार्फत बांधलेले बंधारे प्रत्यक्षात साकारले नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी तसेच पाण्याचे स्रोत वाढले नाहीत हे देखील पाणी टंचाई मागचे वेगळे कारण मानले जाते.