Kalyan Pet Dog Bites Boy Pudhari
ठाणे

Kalyan Dog Attack | कल्याणमध्ये पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी: थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पश्चिमेकडे असलेल्या वाडेकर परिसरातील साई शरण बिल्डिंगमध्ये एका लहान मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची थरारक घटना

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Pet Dog Bites Boy

डोंबिवली : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांनंतर आता पाळीव कुत्र्याने एका मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिमेकडे असलेल्या वाडेकर परिसरातील साई शरण बिल्डिंगमध्ये एका लहान मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, साई शरण बिल्डिंगच्या आवारात हा चिमुकला खेळत असताना अचानक एका पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने थेट चिमुकल्याचा चावा घेतल्याने तो घाबरून रडू लागला. सुदैवाने मालकाने काठीने मार देऊन कुत्र्याला बाजूला केले आणि मुलाला वाचविले. ही संपूर्ण घटना तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.

या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून आपल्या लहान मुलांना सोसायटीच्या आवारात खेळण्यासाठी पाठवायचे तरी कसे ? असा प्रश्न पालकांना पडला आहे. पाळीव कुत्रा पाळताना त्याच्या मालकाने आवश्यक ती काळजी घेणे, कुत्र्याला तोंडपट्टी आणि पट्टा लावणे बंधनकारक असताना अनेक कुत्रे मालक नियमांना सर्रासपणे हरताळ फासत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनंतर आता पाळीव कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. महानगरपालिकेने पाळीव कुत्र्यांबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, बेजबाबदार कुत्रे मालकांवर कठोर कारवाई करावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT