डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली उड्डाणपूल बाधितांच्या मोबदल्याअभावी गेल्या 6 वर्षांपासून रखडला आहे. या पुलाच्या बांधकामाला येत्या 10 दिवसांत सुरुवात झाली नाही तर लोकाग्रहास्तव मनसे रस्त्यावर उतरणार आहे. या संदर्भात मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स ट्विटद्वारे शासन/प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
मध्य रेल्वेमार्गावर डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान असलेल्या स. वा. जोशी शाळेसमोरच्या पूर्व-पश्चिमेला जोडणार्या उड्डाण पुलाच्या कामात ठाकुर्ली जवळील रहिवासी बाधित झाले होते. वर्षानुवर्षे संतवाडीत राहणार्या साठ रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाईच्या मुद्द्यांमुळे गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे बांधकाम जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात येणार होते. परंतु हे काम आजतागायत सुरू झाले नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या प्रकल्पात बाधित झालेल्या 60 रहिवाशांना भरपाई म्हणून घरे देऊन हा अडथळा दूर केला आहे.
तथापि तब्बल 6 वर्षांपासून या रहिवाशांना मोबदला न दिल्याने हे काम रखडल्याचे मनसेचे नेते तथा माजी आ. राजू पाटील यांनी त्यांच्या पोस्टद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे.
स. वा. जोशी शाळा-ठाकुर्ली रेल्वे फाटक ते 90 फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकापर्यंत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेतला होता. या ठिकाणी पूल न बांधता रस्ता बांधण्यात यावा. यामुळे कमीत कमी रहिवाशांच्या घरांचे नुकसान होईल. या मार्गाच्या दुतर्फा स्थानिकांना छोटे-मोठे व्यवसाय करता येतील, अशी भूमिका पदाधिकार्यांनी घेतली होती. परंत उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेण्यात आला.
या पुलामुळे ठाकुर्ली पूर्वेकडे असलेल्या रेल्वे स्थानकाजवळच्या संतवाडीतील 60 कुटुंबे आणि लगतच्या म्हसोबा नगर झोपडपट्टीतील 28 कुटुंबे बाधित झाली आहेत. एकीकडे रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तर दुसरीकडे पुलाचे बांधकाम सुरू करण्याबाबतचे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसत नाही. संबंधित प्रशासनाच्या कारभाराचा फटका कायम करदात्या नागरिकांनाच बसत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवसांत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही किंवा या संदर्भात प्रशासनाने खुलासा केला नाही तर मात्र याच अर्धवट पुलावर येत्या 30 जून रोजी मनसे आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स ट्विटद्वारे शासन/प्रशासनाला दिला आहे.