कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्ष एकत्रित निवडणूक लढण्यासाठी सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. पालिकेच्या 122 जागांपैकी बराशच्या जागा वाटपाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसेनेची बोलणी होऊन चर्चा झाली असून साधारण 54 च्या आसपास जागा मनसे पक्षासाठी तर उर्वरित जागा शिवसेना उबाठा व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षासाठी वाटप करण्याचे ठरले असल्याची माहिती मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी दिली . येत्या दोन दिवसात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे टप्पा टप्प्याने मनसे उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मित्रपक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरुन चारही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची बोलणी व चर्चा सुरू झाली त्यात काही कुठल्या प्रकारचे डिस्पुट आता पर्यंत झाले नसून चांगल्या प्रकारे जागा वाटपाचे गणित जुळले असल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले.
जागावाटप जवळपास निश्चित झाले असून काही मोजक्या जागांच्या अदलाबदलीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपावरून काँग्रेस पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतलेले नाही असे सांगण्यात येत असल्या बाबत मनसे नेते पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जागा वाटपाच्या बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
महायुतीची चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान महायुतीकडून असे सूतोवाच करण्यात आले आहे की, 15 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल. याबाबत मनसे नेते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की. शिवसेना आणि भाजप निवडणूकीपूर्वी भांडत राहतात. निवडून आल्यावर एकत्रित येतात. 29 डिसेंबरपर्यंत यांच्या दोघांमध्ये भांडण सुरु राहिल.
30 डिसेंबरला त्यांची युती तुटणार असल्याचे सांगितले. 27 गावे महापालिकेतून वेगळी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे. याचिका न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी निवडणूक कशी काय लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला. मात्र आता निवडणूका होणार असल्याने त्याला सामोरे जाणे हेच आपल्या हाती असल्याचे सांगितले.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
दरम्यान सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने गुरुवारी एक बैठक घेऊन केडीएमसी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन राजकीय नेते, पक्ष, इच्छूक उमेदवारांना केले आहे. याबाबत मनसेने नेते यांनी सांगितले की. समितीची भूमिका रास्त आहे. मनसे त्यांच्या भूमिकेशी सहमत असून त्यांच्या पाठीशी आहे. 2015 साली देखील 27 गावातून कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले होते. मात्र स्वतंत्र नगरपालिका करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. या सगळयाचे तीव्र पडसाद केडीएसी निवडणूकीत उमटणार आहेत.