TET Paper Leak Bihar Connection AI Generated
ठाणे

TET Paper Leak Bihar Connection: ‘टीईटी’ पेपरफुटीचे धागेदोरे बिहारपर्यंत; विजेंद्र गुप्ता मुख्‍य सूत्रधार

हरियाणा, आग्रा, दिल्‍लीत शोधमोहीम

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात बिहार कनेक्शन समोर आले असून, या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्‍याच्‍या नावावर पेपरफुटीसह हत्‍येचा गुन्‍हाही दाखल आहे.

त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र पोलिसांनी बिहार, हरियाणा, दिल्ली आणि आग्रा येथे शोधमोहीम सुरू केली असून, आंतरराज्यीय ‘सॉल्व्हर गँग’चे जाळे उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

भिवंडी पोलिसांना २७ जून रोजी टीईटी प्रश्नपत्रिकेसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजीव साव, आकाश कुमार ऊर्फ सुरज सिंग आणि धीरज सिंग यांना अटक केली.

आरोपींकडून मोठी रोख रक्कम आणि टीईटी प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले. जप्त प्रश्नपत्रिका मूळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता असल्याची माहिती समोर आली.

तो बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील शेरपूर गावाचा रहिवासी असून, त्याच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक बिहारमध्ये दाखल झाले आहे. २००३ मध्ये उच्च शिक्षणासाठी तो बेगुसरायला गेला आणि त्यानंतर त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला. त्याचे नाव पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात आल्याने आम्ही हादरलो आहोत, अशी प्रतिक्रिया विजेंद्रचे वडील बालेश्वर साह यांनी दिली.

पेपरफुटीचा 'डॉन'

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, विजेंद्र गुप्ताची गुन्हेगारी पार्श्वभूमी जुनी असून २००३ मधील एका हत्येच्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर तो विविध राज्यांतील परीक्षा गैरव्यवहार करणाऱ्या टोळीशी जोडला गेला.

बिहार शिक्षक भरती परीक्षा, ओडिशा एसएससी परीक्षा आणि नीट-यूजी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील पेपरफुटी प्रकरणांतही त्याचे नाव समोर आले आहे. ओडिशा एसएससी पेपरफुटी प्रकरणात २८ जुलै २०२३ रोजी त्याला अटक झाली होती. नंतर जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात त्याचे नाव पुढे आले आहे.

तपास अधिक तीव्र

भिवंडी पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू ठेवली असून गुप्तासह या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पेपरफुटीचे आंतरराज्यीय जाळे, आर्थिक व्यवहार आणि सॉल्व्हर गँगचा संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस विविध राज्यांतील पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT