ठाणे : घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून मंदिरात रात्री थांबलेल्या 30 वर्षीय विवाहितेवर मंदिराच्या सेवेकर्यांकडूनच सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा धक्कादायक आणि लांच्छनास्पद प्रकार शिळगाव (ठाणे) येथे घडला. याप्रकरणी तिघा नराधम सेवकर्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (वय 62, रा. कोटा, राजस्थान), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45), राजकुमार रामफेर पांडे (54, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी या तिघांची नावे आहेत. डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह 9 जुलै 2024 रोजी आढळून आला होता. मृत महिलेच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातून महिलेची माहिती घेतली. तसेच आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांत महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल आहे का, याची माहिती मिळवली. त्यात नवी मुंबईच्या एनआरआय पोलिस ठाण्यात बेलापूर गाव येथे राहणारी 30 वर्षीय विवाहिता बेपत्ता असल्याचे समोर आले.
अधिक चौकशीत बेपत्ता झालेल्या महिलेचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. महिलेची ओळख पटल्यानंतर डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला. घटनास्थळी असलेले फुटेज पडताळून बघितले असता घोळ गणपती मंदिर आणि गौशाला परिसरात सेवेकरी असलेल्या दोघांवर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा आणि राजकुमार रामफेर पांडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघे आणि त्यांचा साथीदार श्यामसुंदर प्यारचंद शर्मा या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या विवाहितेला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेस शुद्ध आल्यावर आरडाओरडा केल्यामुळे तिला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली, अशी माहिती डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसनिरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. पोलिसांनी तिसरा आरोपी शर्मा याला मुंबईतून अटक केली आहे.