ठाणे ः टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश-विदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48 वे वर्ष आहे. यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवात तामीळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा देखावा असल्याची माहिती गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
1978 साली टेंभी नाका येथे शिवसनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. यावर्षीचा देखावा 110 फूट लांब तर रुंदी मागच्या बाजूला 45 फूट आणि पुढच्या बाजूला 55 फूट आहे. या देखाव्याची उंची सुमारे 75 फुट असणार आहे. या देखाव्यासाठी सव्वाशे खांब वापरले असून, प्रत्यक्षात 26 खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत. हा देखावा तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या शिल्परचनेवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची 29 फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे.
या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे. बृहदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही. त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले, ज्या लोकांना नुकसान सहन करावे लागले अशा लोकांना श्री दुर्गे दुर्गेश्वरीचरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांना नवस किंवा त्या लोकांना आपण गार्हाणे मांडत आहोत. त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात व गाभार्यात चारधाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरू आहे.
प्रवेशद्वारावर 24 बाय 29 फूट शंकराची मूर्ती
प्रवेशद्वारावर 24 बाय 29 फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती 29 फुटी बृहदेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे समानत्व साध्य करते. तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू आहे.
सध्या जागेवर 125-150 लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझानिंग असे मिळून एकूण 200-250 कलाकार दिवस-रात्र काम करत आहेत. गणपती विसर्जनानंतर वाहतुकीची अडचण लक्षात घेता, केवळ 13 दिवसांत हा देखावा पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण उपस्थित होते.