मिरा रोड : परदेशात नोकरीला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका महिला शिक्षिकेला सायबर भामट्यांनी तब्बल 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. युकेमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी या महिलेकडून 40 लाख 1 हजार 500 रुपये उकळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथील रोझविला इमारतीत राहणाऱ्या 47 वर्षीय शिक्षिका सेनेरिटा कॅझिटन डिसिल्वा यांना आरोपींनी युकेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आणि तिथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवले होते. हा फसवणुकीचा प्रकार 5 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडला.
फिर्यादीला युकेला घेऊन जाण्यासाठी आमचा माणूस दिल्ली विमानतळावर पाठवला आहे, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आमच्या माणसाला पाउंडसह पकडले आहे, असा खोटा बनाव आरोपींनी रचला. त्याला सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
पैसे भरण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले तसेच जी-पे , एटीएम डिपॉझिट मशीन मनी ट्रान्सफर या माध्यमातून एकूण 12 वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास भाग पाडले.
अशा प्रकारे एकूण 40,01,500 रुपये उकळल्यानंतरही कोणतीही नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले. या प्रकरणी सेनेरिटा यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलमासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर हे करत आहेत.