ठाणे

TDCC Bank Election : माजी संचालकांचे नातेवाईक लढविणार ठाणे-पालघर जिल्हा बँकेची निवडणूक

माजी संचालकांच्या नातेवाईकांसह ५ अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सहकारी बँकेच्या संचालकपदी सलग दहा वर्षे राहिलेल्या सभासदाला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा नवा नियम लागू झाल्याने, आता माजी संचालकांच्या नातेवाईकांना आणि कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यानुसार, ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांचे सुपुत्र आकाश पाटील आणि माजी संचालक निलेश भोईर यांच्या पत्नी भाग्यश्री भोईर यांच्यासह पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक २७ जून रोजी होणार असून, २८ जून रोजी मतमोजणी होईल. बँकेच्या २१ जागांसाठी ४,०२७ मतदार मतदान करतील. या संचालकांची विभागणी पुढीलप्रमाणे असेल:

  • तालुका प्रतिनिधी: प्रत्येक तालुक्यातून एक अशा १४ जागा,

  • इतर गट: पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था (१ जागा), खरेदी-विक्री/मच्छिमार/जंगल कामगार/दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था (१ जागा),

  • आरक्षित जागा: महिला प्रतिनिधी (२ जागा), अनुसूचित जाती/जमाती (१ जागा), एनटी/व्हीजेएनटी (१ जागा), ओबीसी (१ जागा),

  • इतर संस्था: खरेदी-विक्री संघ, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था आणि व्यक्तिगत भागधारक (स्थानिक स्वराज्य संस्था व पब्लिक ट्रस्ट) मिळून १ जागा.

अशा एकूण २१ संचालकांची निवड केली जाणार आहे. आज बँकेच्या संचालकपदासाठी अरुण पाटील (कल्याण), आकाश पाटील (ठाणे तालुका), भाग्यश्री भोईर (वाडा), प्रकाश वरकुटे (शहापूर) आणि सुनील पाटील (विक्रमगड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी दिली.

निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने, युती कोणासोबत करायची, याची चाचपणी सुरू झाली आहे. बहुजन विकास आघाडीला सोबत घेतल्याशिवाय बँकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती लागणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. तसेच, शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असल्याने, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२१ च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे ९, भाजपाचे ७ आणि अन्य २ असे एकूण १८ उमेदवार ‘सहकार पॅनल’चे विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT