ठाणे महानगरपालिका file photo
ठाणे

ठाणे मनपाची फसवणूक करणार्‍या होर्डिंग्जवर कारवाई करा

TMC | मनसेचे संदीप पाचंगे यांच्या वतीने जनहित याचिका दाखल

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : घाटकोपरमधील दुर्घटनेमुळे मुंबई-ठाण्यातील मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेने 49 जाहिरात फलकांवर कारवाई केल्याचे सांगितले जात असले, तरी गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणुक करणार्‍या होर्डिंग व्यवसायिकांवर तसेच जाहिरात विभागाच्या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर याप्रकरणी मनसेच्या वतीने जनहित याचिका दाखलही करण्यात आली आहे.

पुण्यात आतापर्यंत तीन होर्डिंग कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण मुंबईतली ही घटना मृत्यूंची संख्या पाहता मोठी आहे. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने शहरातील 49 जाहिरात फलकांवर कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 5 जाहिरात फलक पुर्णपणे निष्कासित करण्यात आले आहेत, तर परवानगी पेक्षा जास्त आकाराच्या 44 जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे गेली कित्येक वर्षे जाहिरातबाजी करून पैसे कमविणार्‍या जाहिरात फलक मालकांना कोणताही दंड न ठोठावता महापालिका फक्त कारवाईचा दिखावा करत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचना क्र. 5 नुसार जाहिरात फलक प्रदर्शित करण्यावरील निर्बंधांमध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक उभारण्यास मनाई आहे. जाहिरात फलक परवानगी घेतलेल्या भूखंडाच्या बाह्य सीमारेषे बाहेर येता कामा नये, खाडीत होर्डिंग उभारता येणार नाही यासारख्या अटींचे पालन केले जात नसतानाही पालिका कोणतीच कारवाई करत नाही.

महानगरपालिकेने तात्काळ सर्व 49 जाहिरात फलक मालकांविरुद्ध तसेच जाहिरात फलक उभारणीसाठी परवानगी देताना स्थळ पाहणी अहवाल चुकीचा देऊन महापालिकेची फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी. याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

अधिकृत,अनधिकृत होर्डिंग्ज कसे ओळखायची ?

ज्या होर्डिंगवर लायसन्स नंबर, एक्सपायरी डेट हे लिहिलेलं असते, ती सर्व अधिकृत होर्डिंग असतात. ज्यावर हे लिहिलेलं नाही, ती अनधिकृत होर्डिंग असतात. 2011 साली अनधिकृत होर्डींगबाबत जनहित याचिकेनंतर पालिकेने होर्डींगच्या परवानगीमध्ये बदल केले होते. पण नियम बनवले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे चौका चौकात मृत्युचे सापळे असलेल्या अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढत असल्याचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT