श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाचे पूरातन स्वयंभू देवस्थान श्री गणेश मंदिर. Pudhari News Network
ठाणे

Swayambhu Shri Ganesh Temple : उपनगरातील वजिरा नाका स्वयंभू श्री गणेश मंदिर

बोरिवली तसेच दूरच्या ठिकाणांहून श्रींच्या दर्शनास येतात भक्तगण

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली (ठाणे) : फार वर्षांपूर्वी बोरिवली पश्चिमेला वजीरा गावठाण भाग खडकाळ होता. ठेकेदार सुरुंग लावून खडक फोडून बांधकामासाठी खडी पुरवत असत. एके दिवशी एक कामगार एका मोठ्या दगडाला सुरुंग लावण्याचे काम करत होता. दुपारचे भोजन घेऊन थोड्या विश्रांतीसाठी तो पहुडला. तेव्हा झोपेत श्रीं नी त्याला दृष्टांत दिला. त्यात तू फोडत असलेला खडक फोडू नकोस, माझी स्थापना येथे होणार आहे. त्या कामगाराने झोपेतून उठल्यावर ही घटना आपल्या सहकार्‍यास व ठेकेदारास सांगितली. या घटनेमुळे खडक फोडण्याचे काम स्थगित करण्यात आले. हा चमत्कार घडला त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्याच खडकावर श्री गणेश मूर्ती दिसू लागली. तेच हे स्वयंभू श्री गणेश मंदिर. कुणी म्हणतात हे पांडवकालीन शिल्प असावे, तर द्रविडकालीन असावे, असेही म्हटले जाते.

मुंबई उपनगरातील बोरिवली हे विकसीत होणारे महत्वाचे ठिकाण आहे. पूर्वेकडे डोंगरात वसलेले कान्हेरी गुंफांचे स्थळ व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच पश्चिमेला गोराई खाडी व पलिकडे अरबी महासागर. लोकमान्य टिळक मार्गावरुन पश्चिमेला गोराई खाडीकडे जाताना एक मैलावर वजीरा गाव लागते. गावात शिरल्यावर एक स्वयंभू गणेश देवस्थान लागते तेच हे श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाचे पूरातन स्वयंभू देवस्थान श्री गणेश मंदिर.

बोरिवली वजीरा येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा इतिहास फार जुना आहे. मंदिराच्या परिसरात तलाव आहे. मंदिराच्या पश्चिमेस ग्रामस्थांचे कुलदैवत श्री आलजी देव मंदिर आहे. खडकावर श्री गणेशाचीं मूर्ती दिसू लागल्याने ग्रामस्थ तेथे मनोभावे पूजा करू लागले. भक्तांचा दर्शनाचा ओघ वाढत गेला. हा खडक हत्तीपेक्षा बराच मोठा आहे.सदर मूर्ती सार्‍या अवयवांसह आहे. पूर्वी हा खडक पाण्याच्या दलदलीत होता. अक्षरशः भक्तांना मान उंच करुन दर्शन घ्यावे लागे. पण, नंतर स्थानिक ग्रामस्थांकडून जमिनीत भराव टाकून आजूबाजूचे खड्डे बुजवले.आता श्रीं चे दर्शन समोर उभे राहून घेता येते. मुंबईचे मूळ नागरिक कोळी आणि सोमवंशीय क्षत्रिय पाठारे समाज (पाच कळशी) यांनी या मंदिर उभारणीचे काम केले. ग्रामस्थांनी मोठ्या श्रमदानाने मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुशोभित केला. मंदिराच्या पूर्वेला सभागृह व कार्यालय तर दक्षिणेकडे सुंदर उद्यान आहे. पश्चिमेला तलावाचे बांधकाम करण्यात आले आहे. उत्तरेला भाविकांना उभे राहण्यासाठी व्यवस्थित शेड बांधण्यात आले आहे.दिवसेंदिवस भक्तांना येणार्‍या अनुभवांमुळे बोरिवली व इतर दूरच्या ठिकाणांहून भक्तगण श्रीं च्या दर्शनास येतात.

मंदिर व्यवस्थापनाचे उपक्रम

गणपतीच्या उत्सवाव्यतिरिक्त इतरही बरेच प्रासंगिक उत्सव, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. या मंदिराच्या मिळकतीच्या रक्कमेतून व्यायामशाळा व विनामुल्य वाचनालय चालविले जाते. मार्गदर्शन शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आपल्या देशावर, राज्यात कोणत्याही प्रकारची संकटे आली की वेळोवेळी देवस्थानाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे अंध व अपंग व्यक्तींना मदत कार्य केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT