मुंबई : पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये स्वप्नील जोशीला वरिष्ठ प्रतिनिधी (करमणूक) श्रेयस सावंत यांनी विविध विषयांवर बोलते केले.  (छाया : मृगेश बांदिवडेकर)
ठाणे

Pudhari Mahasummit 2026 | आपल्या मातीतील गोष्ट सांगणारे मराठी चित्रपट हिट होतातच

Swapnil Joshi Marathi Cinema : मराठी सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठताना पाहणे आनंददायी : अभिनेता स्वप्नील जोशी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : श्रद्धा कांदळकर

“ज्या सिनेमांनी आपल्या मातीतील, आपली गोष्ट सांगितली, ते सिनेमे प्रेक्षकांनी स्वीकारले. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या मातीतील गोष्ट आपलेपणाने आणि ताकदीने सांगितली, तर ती सुपरहिट होणारच,” असे मत अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केले. पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये स्वप्नील जोशीला वरिष्ठ प्रतिनिधी (करमणूक ) श्रेयस सावंत यांनी बोलते केले. यावेळी स्वप्नीलने मराठी चित्रपट आणि रंगभूमीविषयीचे आपले मत व्यक्त केले.

मराठी सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठणे ही केवळ आर्थिक यशाची बाब नसून, मराठी चित्रपटही मोठ्या व्यावसायिक उंचीवर पोहोचू शकतो, याचा ठोस पुरावा असल्याचे स्वप्नीलने सांगितले. मराठी कलाकार म्हणून मराठी सिनेमाला चांगले दिवस येत असल्याचे पाहणे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलने व्यक्त केली.

मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असला, तरी मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम आणि पुरेसे स्क्रीनिंग मिळत नसल्याच्या विषयावर स्वप्नील म्हणाला, यासाठी केवळ चित्रपट निर्माते किंवा कलाकारांना दोष देऊन चालणार नाही, तर प्रेक्षकांनी मराठी सिनेमासाठी आग्रह धरला पाहिजे. “नाटकाला ज्या हट्टाने जाता, त्याच हट्टाने मराठी सिनेमाला गेले पाहिजे. आगाऊ बुकिंग करून तिकीट काढून सिनेमा पाहिला पाहिजे. प्रेक्षकांनी अशी भूमिका घेतली तरच सिनेमाला अधिक स्क्रीनिंग मिळेल,” स्क्रीनिंग मिळत नाही, अशी तक्रार करण्यापेक्षा मराठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करून आपली ताकद दाखवणे गरजेचे आहे, असेही स्वप्नीलने स्पष्ट केले.

मराठी सिनेमाच्या व्यावसायिक प्रवासाबद्दल बोलताना स्वप्नीलने ‘दुनियादारी’चा अनुभवही सांगितला. ‘दुनियादारी’च्या निमित्ताने सिनेमात आलेला बदल मराठी प्रेक्षकांनी स्वीकारला. या चित्रपटाने मराठी सिनेमाला व्यावसायिक फायदा म्हणजे नेमके काय असते, याची जाणीव करून दिली, असे स्वप्नीलने नमूद केले. मराठी सिनेमा केवळ आशयाच्या पातळीवर चांगला असण्यापेक्षा तो प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणणारा आणि व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरणारा असला पाहिजे, असे स्वप्नीलने सांगितले.

रंगभूमीबद्दल बोलताना स्वप्नीलने तिथले वेगळेपण नमूद केले. “नाटकाची गंमत अशी आहे की, त्याचा प्रतिसाद तिथेच मिळतो. प्रयोग सुरू असताना आलेल्या टाळ्या, शिट्ट्या, उशिरा आलेल्या टाळ्या किंवा एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद न मिळणे, यातून काय चुकतेय आणि काय भावतेय, हे लगेच कळते,” असे स्वप्नील म्हणाला. पडदा पडताना मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्यांमधून कलाकाराला मिळणारे समाधान अतुलनीय असते. कलाकारासाठी पैसे आणि मानधन महत्त्वाचे असले तरी प्रेक्षकांकडून मिळणारे कौतुक हे लाखमोलाचे असते. रंगभूमीवर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातला हा थेट संवादच नाटकाला इतर माध्यमांपेक्षा वेगळे स्थान देतो, असे स्वप्नील म्हणाला.

आजही मराठी नाटकांच्या प्रयोगांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागतात, याचे श्रेय आधीच्या पिढीला असल्याचे स्वप्नीलने सांगितले. वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, गिरीश ओक, डॉ. श्रीराम लागू यांच्यासह त्या पिढीतील कलाकारांनी मराठी रंगभूमी रुजवली. त्या पिढीने नाटक केवळ केले नाही, तर ते महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवले. त्यामुळेच आज नाटक पाहणे ही केवळ करमणूक न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग बनले आहे, असे स्वप्नीलने नमूद केले.

दरम्यान, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबतही स्वप्नीलने आपली भूमिका मांडली. आजच्या काळात ट्रोल होणे त्रासदायक असले, तरी काही अंशी ते गरजेचेही झाले आहे. “जो माणूस ट्रोल होतो, तो चर्चेत असतो. ट्रोलिंगकडे सकारात्मक पद्धतीने पाहायचे की त्याचा त्रास करून घ्यायचा, हे आपल्या हातात असते, आपल्याला कोण आणि कशामुळे प्रभावित किंवा नियंत्रित करत आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणे किंवा प्रत्येक ट्रोलिंग मनावर घेणे आवश्यक नाही, असे मत स्वप्नीलने मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT