सुदेश भोसले यांच्या कला जीवनाचा उलगडला प्रवास pudhari photo
ठाणे

Sudesh Bhosale performance : सुदेश भोसले यांच्या कला जीवनाचा उलगडला प्रवास

आवाजातील नजाकत ठाणेकरांनी अनुभवली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः चित्रपट व संगीत क्षेत्रातील तब्बल 50 वर्षांहून अधिक समृद्ध कारकिर्दीत 19 पार्श्वगायक व 28 अभिनेत्यांचे हुबेहुब आवाज काढणाऱ्या सुदेश भोसले यांच्या आवाजातील नजाकत ठाणेकरांनी अनुभवली.

ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात सलग 22 व्या वर्षी व्याख्यानमाला भरविण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्याबरोबर ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. वयाच्या 14 व्या वर्षी चित्रपटाच्या पोस्टरच्या पेंटरपासून पार्श्वगायकापर्यंत झालेला जीवन प्रवास मांडला. आपल्या कारकिर्दीचे भावविश्व रसिकांपुढे उलगडले.

मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन संजीवा व कार्यवाह सतीश सावंत यांनी स्वागत केले. या वेळी पदाधिकारी समीर चव्हाण, अनंता सुर्वे, गुरु स्वामी,महापौर शर्मिला पिंपळोलकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका मालती पाटील, प्रकाश कोटवाणी, राहुल लोंढे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आशा भोसले व अमिताभ बच्चन हे दोन एबी आयुष्यात आल्यानंतर जीवन बदलून गेले. मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रामध्ये असताना पंचमदा यांचे वडील सचिनदेव बर्मन यांचे गीत हुबेहुब गायले होते. ते ऐकून आशाताईंनी माझी पहिली शिफारस संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांच्याकडे केली. पंचमदा यांना माझे वडिलांच्या आवाजातील गाणे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आणि माझी थेट हाँगकाँग दौऱ्यासाठी निवड केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील एक संवाद बोलल्यानंतर मित्राने मला अमिताभ बच्चन यांच्यासारखा आवाज असल्याची जाणीव करून दिली. नंतर मी मेलोडी मेकर्समध्ये त्यांची गीते सादर करण्याची संधी मिळाली. अभिनेते शशी कपूर यांच्या अजूबा चित्रपटात संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी पहिल्यांदा या अली हे गाणे गाण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. जुम्मा चुम्मा दे दे हे गीत 1991 मध्ये पहिल्यांदा गायलो. त्यानंतर अमितजींबरोबरील एकत्रित दौऱ्यानंतर निर्माण झालेला स्नेह हा वर्षानुवर्षे वाढत गेला. याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT