ठाणे : दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही माणुसकीला कवटाळणारा निर्णय घेण्याचे धैर्य ठाण्यातील एका कुटुंबाने दाखवले. आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याच्या वेदना बाजूला ठेवत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सहा गरजू रुग्णांना नवे आयुष्य लाभले. मृत्यूनंतरही माणूस किती मोठा ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठाण्यातून समाजासमोर आले आहे.
ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांचे प्राण वाचले. ठाण्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असून, तिचे अवयव ठाणे, मुंबई आणि दिल्ली येथील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. ठाणे येथील रहिवासी असलेल्या या महिलेला १९ डिसेंबर रोजी मेंदूत अचानक रक्तस्राव झाल्याने हाजुरी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने २५ डिसेंबर रोजी तिला 'ब्रेन डेड' घोषित करण्यात आले. हा क्षण कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी होता. मात्र याच कठीण काळात डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. 'आपल्या दुःखातून इतरांचे आयुष्य वाचू शकते' या जाणिवेने कुटुंबीयांनी भावना आवरून समाजहिताचा निर्णय घेतला आणि अवयवदानासाठी संमती दिली. एका आईचा शेवटचा श्वास सहा जणांच्या जीवनाचा श्वास ठरला.
२६ डिसेंबर रोजी डॉ. विनीत रणवीर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये यकृत, दोन मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस असे सहा महत्त्वाचे अवयव दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या 'ग्रीन कॉरिडॉर 'मुळे ठाण्याहून पवईपर्यंतचे हृदय अवघ्या १७ मिनिटांत पोहोचवण्यात आले आणि एका रुग्णाचा जीव वाचवता आला. पाच अवयव मुंबईतील रुग्णांना, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला देण्यात आला.
ब्रेन डेड घोषित झाल्यानंतर ठरावीक वेळेत अवयवदान झाले, तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.डॉ. विनीत रणवीर
अवयवदान ठरावीक वेळेत झाले, म्हणूनच ही शस्त्रक्रिया शक्य झाली. मेंदूमृत व्यक्तीचे अवयव योग्य वेळी दान केल्यास अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळू शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या घटनेने केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही माणुसकीचा नवा आदर्श दिला आहे. एका आईने जगातून जाताना सहा जणांच्या आयुष्यात आशेचा दीप उजळवला हीच तिच्या जीवनाला मिळालेली खरी श्रद्धांजली ठरली.