डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झुंडीच्या झुंडीने फिरणार्या भटक्या श्वानांच्या दहशतीपायी कल्याण-डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. त्यात कल्याणच्या एका दिव्यांग महिलेवर भटक्या श्वानाने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्यातून ही महिला कशीबशी बचावली तरी ती जखमी झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या 4 महिन्यांत 8 हजार 789 जणांचे लचके तोडल्याची आकडेवारी समोर आल्याने अशा आक्रमक श्वानांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे.
भटक्या श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवलीतही रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. भटक्या श्वानांमुळे वादंग निर्माण होत आहेत. भटके श्वान पादचार्यांना लक्ष्य करतात. त्यात महिला व लहान मुलांची संख्या जास्त आहे. महापालिका हद्दीत गेल्या चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी 8 हजार 789 जणांना चावा घेतला आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भटक्या श्वानांची उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी कल्याण-डोंबिवलीकरांकडून केली जात आहे. टिटवाळ्यात भटक्या श्वानांनी एका फिरस्त्या महिलेला कडाडून चावे घेतले होते. मुंबईतील रुग्णालयात उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. कल्याणमधील एका शाळकरी मुलाला भटक्या श्वानाने चावा घेतला होता. त्यातून कसाबसा बचावला.
या घटनांनंतर कल्याण पश्चिमेतील सोसायटीत दुर्दैवी घटना घडली. या सोसायटीतील एका दिव्यांग महिलेच्या अंगावर भटका श्वान धावून गेला. त्या खाली पडल्या. यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.एक तर ही महिला दिव्यांग आणि त्यातच त्यांच्या अंगावर श्वान धावून गेला. यात त्या गंभीर स्वरूपात जखमी झाल्या. त्यामुळे सोसायटीतील रहिवासी प्रचंड संतापले. भटक्या श्वानांचा सोसायटीतील रहिवाशांना प्रचंड त्रास आहे. विशेषत: वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या अंगावर भटके श्वान धावून जातात. त्यात मुले आणि वयोवृद्ध खाली पडून जखमी होतात.
...अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी केडीएमसीला तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेत केडीएमसीची गाडी भटक्या श्वानांना पकडण्यासाठी आली. तेव्हा काही प्राणी मित्रांनी विरोध केला. केडीएमसीची गाडी श्वानांना न पकडताच रिकाम्या हाताने माघारी फिरली. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. लोकांची एकच मागणी आहे, भटक्या श्वानांसाठी शेल्टरची व्यवस्था केली पाहिजे. 4 महिन्यांत भटक्या श्वानांनी चावा घेतलेल्या 8,789 जणांना पालिकेच्या रुग्णालायात अँटी रेबीज लस देण्यात आली आहे.