ठाणे : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अतिसारासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने ठाणे जिल्ह्यात सुरक्षित पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत 'स्टॉप डायरिया कॅम्पेन २०२६' प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळांतील विद्यार्थ्यांनाच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, ते फील्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाण्याची तपासणी करून त्याची नियमित नोंद ठेवणार आहेत. यासोबतच ग्रामपातळीवर पाणी समित्यांची स्थापना, शाळा-अंगणवाड्यांमधील स्वच्छतेवर भर, पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा व जनजागृती अशा विविध उपाययोजनांद्वारे अतिसार मुक्त व निरोगी जिल्हा घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत 'स्टॉप डायरिया कॅम्पेन २०२६' राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभावमुळे अतिसाराचा प्रादुर्भाव वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच ग्रामपंचायत यंत्रणा यांच्या समन्वयातून सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य शिक्षण आणि जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.
या अभियानात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग निश्चित केला आहे. जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणीदरम्यान पाण्यातील आवश्यक निकषांची पाहणी करून त्याची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याबरोबरच सुरक्षित पाणी, स्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता वाढणार आहे.
हे विद्यार्थी आपले कुटुंब व गावातही सुरक्षित पाणी वापरण्याबाबत जनजागृती करतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. अभियानांतर्गत गावागावांत पाणी समित्यांची स्थापना करून स्थानिक जलव्यवस्थापन अधिक सक्षम केले जात आहे.
जिल्हा अतिसारमुक्त, निरोगी घडविणार
अभियानाच्या अंतिम टप्प्यात स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने पाणी स्रोतांचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन, ओडिएफ शाश्वतता आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पाणी गुणवत्तेबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून प्रत्येक घराला सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे दस्तावेजीकरण करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून, सामूहिक सहभागातून अतिसारमुक्त आणि निरोगी ठाणे जिल्हा घडविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.