भाईंदर : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यवसायिक दृष्टिकोन दाखवित योग्य वेळी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे एसटी महामंडळाची इंधन सवलतीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाच्या बसेसना इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा केला जातो. महामंडळाकडून डिझेलची मोठी मागणी होत असल्याने त्यात सवलत देण्याची मागणी सरनाईक यांनी लावून धरली होती. अखेर त्यात त्यांना यश आल्यानंतर त्या तेल कंपन्यांकडून येत्या 1 ऑगस्ट पासून एसटी महामंडळाच्या बसेसना पुरविण्यात येणार्या डिझेलवर अगोदरपासून देण्यात येणार्या सवलतीत आणखी 30 पैशांची प्रती लीटरमागे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.
या अतिरीक्त सवलतीमुळे महामंडळाची दिवसाला सरासरी 3 लाख 23 हजार रुपये प्रमाणे वर्षाला सुमारे 12 कोटी (अंदाजे 11 कोटी 80 लाख रुपये) रुपयांची बचत होणार आहे. गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्याकडून डिझेल खरेदी करीत आहे.
या कंपन्यांकडून एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10 कोटी 78 लाख लीटर डिझेल पुरवठा केला जातो. सरनाईक यांनी त्या तेल कंपन्यांकडे व्यक्तिशः पाठपुरावा करून महामंडळाला देण्यात येणार्या सवलतीमध्ये वाढ करण्याची मागणी लावून धरली.
सध्या राज्यभरातील एसटीच्या 251 आगारातील इंधन पंपाद्वारे दररोज सरासरी 10 कोटी 78 लाख लीटर डिझेलचा पुरवठा केला जात असून वाढणार्या बसेसच्या संख्येमुळे डिझेलच्या मागणीत वाढ होते. तत्पूर्वी 30 पैशांच्या प्रती लीटरमागील अतिरीक्त सवलतीमुळे महामंडळाची वर्षाकाठी सुमारे 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने महामंडळाची ज्या-ज्या ठिकाणी पैशाची बचत तसेच काटकसर करणे शक्य होईल त्या-त्या ठिकाणी पैशाची बचत व काटकसर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामंडळाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट विक्रीखेरीज उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण केले जाणार असल्याने त्यातून भविष्यात एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.