ठाणे

ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावरून खासदार शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सोनाली जाधव

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असे विधान करून ओमर अब्दुल्ला यांनी विरोध दर्शविला आहे. ओमर अब्दुल्लांच्या या विधानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी ओमर अब्दुल्ला यांना जाब विचारण्याची हिंमत ठेवावी, असा सवाल करत खासदार डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, अशा वक्तव्यातून महाराष्ट्राबद्दल असलेली द्वेषभावना व्यक्त केली आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. आपण देखील तीव्र शब्दात निषेध करतो, असे सांगून खा. डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पाहिले होते. बाळासाहेबांचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्याच जम्मू-काश्मिरमध्ये महाराष्ट्र सदनाला विरोध करणारे ओमर अब्दुल्ला हे तुमच्याच इंडिया अलायन्समधले सहकारी आहेत. त्यांना एका शब्दात जाब विचारावा, असे आवाहनही खा. डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केले.

प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून जातात. ट्युरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जम्मू-काश्मिरला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळते. जे राहूल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचे काम हे लोक करतात. ज्या शिवतिर्थावरून हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वाभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचे काम केले त्या शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची देखिल हिम्मत झाली नाही, तर ओमर अब्दुल्ला यांना जाब विचारण्याची हिम्मत कुठून येईल, असाही सवाल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT