डोंबिवलीत ऑलिम्पिकला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
ठाणे

डोंबिवलीत ऑलिम्पिकला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

80 शाळांतील 2700 विद्यार्थ्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली शहर आणि परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मैदानी व बैठ्या खेळांमध्ये 80 शाळांमधील 2 हजार 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष माधव सिंग यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने, तसेच सचिव चक्रपाणी शुक्ला यांच्यासह सर्व रोटेरियनच्या सहकार्याने फ्लॅगशिप प्रोजेक्टच्या या अद्भुत उपक्रमाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या फ्लॅगशिपच्या प्रोजेक्टचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता, रो. डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धांमध्ये 80 हून अधिक शाळांतील 2 हजार 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खो खो, कबड्डी, पोहणे, धावणे, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, फुटबॉल, बॅडमिंटन, डॉजबॉल, कॅरम, बुद्धिबळ, आदी खेळांचा यात समावेश होता. दोन दिवस चाललेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेचा सांगता समारंभ रविवारी सायंकाळी करण्यात आला. डोंबिवली ऑलिम्पिक्स हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर तो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कौशल्ये, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रचार, तसेच क्रीडात्मा प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ होते. हे दोन दिवस अद्वितीय होते, जिथे मैत्री, मनोरंजन, आणि समर्पण व संघभावनेचे प्रेरणादायी क्षण अनुभवले गेले. हा प्रकल्प शिक्षक, शाळा, आणि रोटेरियन यांच्या अद्भुत सहकार्याने यशस्वी झाल्याची भावना अध्यक्ष रो. माधव सिंग यांनी व्यक्त केली. या उपक्रमाद्वारे आम्ही भविष्यातील खेळाडू आणि नेत्यांना घडवून आपल्या देशाला अभिमान वाटेल अशा योगदानाचा अभिमान बाळगतो. अशा संस्मरणीय उपक्रमामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे अनन्य साधारण महत्व आहेच, त्यामुळे सर्वांनी मिळून समाजासाठी काहीतरी विलक्षण निर्माण केल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT