स्मार्ट कल्याणमध्ये पुन्हा कचराकोंडी  pudhari photo
ठाणे

Kalyan garbage issue : स्मार्ट कल्याणमध्ये पुन्हा कचराकोंडी

ठेकेदाराच्या मनमानीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

सापाड : कल्याण पूर्व नांदिवली मुख्य रस्त्याशेजारी साचलेले कचर्‍याचे ढिगार नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करत आहेत. पावसाळ्याच्या काळात या ढिगार्‍यांमुळे रोगराई पसरू नये याची भीती व्यक्त केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कचरा संकलनासाठी तब्बल दहा वर्षांचा ठेका सुमित कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीला दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपये देण्यात येतात. एवढा प्रचंड निधी खर्च करूनही शहरात कचर्‍याचे ढिगार साचत आहेत, ही बाब संतापजनक ठरली आहे.

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. नांदिवलीसह अनेक भागांत रस्त्याच्या कडेला ढिगारे पडून राहतात. पावसामुळे या कचर्‍यातून असह्य दुर्गंधी येते, तसेच डास, माशांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारख्या साथीचे आजार पसरल्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचे कचरा व्यवस्थापन सुधारलेले नाही, उलट नागरिकांच्या जीवनमानाशी खेळ केला जातो आहे.

सुमित कंपनीला ठेका देऊन महापालिकेने जबाबदारी झटकली आहे का? असा थेट सवाल स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नांदिवली रस्त्याशेजारील कचर्‍याचे ढिगार हे केवळ शहराचे सौंदर्यभंग करणारे नाहीत, तर शहरवासियांसाठी आरोग्याचा धोका निर्माण करणारा आहे. तरीही महापालिका प्रशासन आणि ठेकेदार याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

ठेकेदार कंपनीवर कारवाई केव्हा ?

या कचर्‍याच्या ढिगारांमुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कचरा तात्काळ हटवून शहर स्वच्छ केले नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. महापालिका व ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न दूर करावा. अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या संदर्भात पालिका अधिकारी यांच्याशी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT