water crisis file photo
ठाणे

Shrivardhan Jal Jeevan Mission: जलसंकटाच्या काळात जलजीवन मिशनची कामे अपुरी

श्रीवर्धन तालुक्यातील योजनांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; कामांचे ऑडिट करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन: अनिकेत मोहित एकीकडे श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या योजनांची अंमलबजावणी होत असताना अनेक ठिकाणी कामे रखडलेली असून, काही ठिकाणी झालेल्या कामांच्या गुणवत्तेवरही स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे विभागातील जलजीवन मिशनची योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही योजना वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली असती तर सध्याच्या पाणी संकटाच्या काळात ग्रामस्थांना मोठा आधार मिळाला असता, अशी भावना व्यक्त होत आहे.

काही ठिकाणी पाईपलाईन, जलसाठा व्यवस्था आणि इतर संबंधित कामांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठेकेदारांकडून कामे केवळ कागदावर पूर्ण दाखवली जात आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पाहणी करून कामांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या सर्व कामांचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, तसेच वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, कामाची प्रत्यक्ष स्थिती आणि निधीचा योग्य वापर याची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

थेट फटका ग्रामीण जनतेला

पाणी हा नागरिकांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय असताना, योजनांमध्ये हलगर्जीपणा किंवा निकृष्ट कामे झाल्यास त्याचा थेट फटका ग्रामीण जनतेला बसतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व गावांमधील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT