सापाड : योगेश गोडे
डोंबिवलीकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. 27 गावांच्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेतली. या बैठकीत 499 कर्मचार्यांच्या नियुक्तीपासून ते शहरातील पायाभूत विकासकामांपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत 2010 मध्ये नियुक्त झालेल्या 499 कर्मचारी यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. हे कर्मचारी पुन्हा त्याच पदावर रुजू होणार असून, शासनानेही ही मागणी मंजूर केली आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर 180 कर्मचार्यांना कन्फर्मेशन लेटर देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार शिंदे यांनी केली. याशिवाय कल्याणच्या कचोरे टेकडी येथे संत सावळाराम महाराज स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
वारकर्यांसाठी आणि भक्तांसाठी हे स्मारक ऐतिहासिक ठरणार असल्याचेही शिंदे म्हणाले. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणण्यात आला असून, कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. यामुळे खड्ड्यांचा प्रश्न कायमचा शंभर टक्के निकाली निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. दिघे साहेबांना विरोध करायचं काम जेव्हा काही लोकांनी केलं होतं, तेच लोक आज रोज उठून शिव्या-शाप देतात. त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. अशा लोकांकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, असा टोला खासदार शिंदेंनी संजय राऊतांना लगावला.
निवडणुका आल्या की नेते येतातच. प्रत्येक नेता आपला पक्ष वाढवण्याचं काम करतो. राज ठाकरे उद्या कल्याणमध्ये येत आहेत, हेही त्याचाच एक भाग आहे, असे शिंदे राज ठाकरे कल्याणमध्ये येण्यावरून श्रीकांत शिंदे म्हणाले. एकूणच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने 27 गावांच्या समस्या मार्गी लागणार असून कर्मचार्यांना नवरात्रीपूर्वी दिलासा मिळणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामांना गती मिळणार असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.