नेवाळी (जि. ठाणे) : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर सेवा अखेर सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर दाखल झाली आहे. रविवारी भाजप आमदार किसन कथोरे, आ. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते फ्युनिक्युलर सेवा सुरू करण्यात आली आहे.
श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर सेवा सुरू केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कथोरे म्हणाले, खूप वर्षांपासून मलंगगडासाठी फ्युनिक्युलर सुरू व्हावी, हे स्वप्न होते. काही काळ अडथळे आले, विविध एजन्सींमध्ये मतभेद झाले. त्यामुळे प्रकल्प लांबला होता. मात्र, आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या यात्रेआधीच हा प्रकल्प सुरू झाल्याने भाविकांना मोठा फायदा होईल. विशेषतः वृद्ध, आजारी आणि चालण्यात अडचण असणाऱ्या नागरिकांना दर्शनासाठी मोठी सोय होणार आहे. मलंगगडचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे.
2004 मध्ये मलंगगडावर फ्युनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला.
2012 मध्ये पथदर्शी प्रकल्पांमध्ये समावेश करून प्रत्यक्ष कामास सुरुवात.
50 रुपये आहे मलंगगडावर फ्युनिक्युलर रोपवेतून जाणे-येण्याचा तिकीट दर.
75 वर्षांवरील नागरिक व 21 वर्षांखालील प्रवाशांना 50 टक्के सवलत.
4 ते 5 मिनिटे इतका राहणार आहे मलंगगडावरील प्रवासाचा कालावधी.
90 प्रवासी एका वेळी वाहून नेण्याची क्षमता आहे या रोपवेमध्ये.