Malang Gad Funicular Service Pudhari
ठाणे

Malang Gad Funicular Service: श्री मलंगगड फ्युनिक्युलरला तांत्रिक बिघाडाचा फटका; सोशल मीडियावर अफवा

श्री मलंगगडच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या एक्सलमध्ये गुरुवारी सायंकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना मध्येत थांबलेल्या डब्यातून आपत्कालीन मार्गाने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: श्री मलंगगडच्या सर्वात लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर सेवेला तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळी फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या एक्सलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दुरुस्ती पथकाकडून फ्युनिक्युलर सेवा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सेवा पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल, याबाबत फ्युनिक्युलर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फ्युनिक्युलरच्या प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानंतर श्री मलंगगडावरून पायथ्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्येत थांबलेल्या डब्यातन उतरवून आपत्कालीन मार्गाने खाली उतरविण्यात आले.

या घटनेत कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाडाची माहिती समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर फ्युनिक्युलरला अपघात झाल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर फ्युनिक्युलर प्रशासनाने अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तर फ्युनिक्युलरच्या ट्रॉलीच्या एक्सलमध्ये बिघाड झाला असून, त्याची तांत्रिक तपासणी व दुरुस्ती सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात श्री मलंगगडावर भाविकांची मोठी गर्दी होत असताना फ्युनिक्युलर सेवा बंद झाल्याने भाविक आणि पर्यटकांची गैरसोय सुरू झाली आहे. सेवा नेमकी कधी सुरू होणार, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे. तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तपासणी पूर्ण करूनच सेवा सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या भूमिकेतून दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT