उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना गुरांसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन रागाच्या भरात मारले. मुलांना घाबरवून हाकलून लावण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.३) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कॅम्प २ मधील आझादनगर परिसरातील कुंजबिहारी तबेला समोर ही घटना घडली आहे. या ठिकाणी राहणारा मुकेश अशोक गुप्ता यांचा मुलगा धैर्य मुकेश गुप्ता आणि त्याचा मित्र युवराज विजय शर्मा हे सार्वजनिक रस्त्यावर उभे होते. त्यावेळी संशयीत आरोपी कन्हैया कुंजबिहारी यादव उर्फ शिवा याने अज्ञात कारणावरून रागाच्या भरात आणि मुलांना घाबरवून तिथून पळवून लावण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेले गुरांसाठी वापरले जाणारे इंजेक्शन या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या कमरेखाली मारले.
फिर्यादी मुकेश गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कन्हैया कुंजबिहारी यादव उर्फ शिवा याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 125 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता भोईगड करत आहेत.