Dombivli Voter List Controversy
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघ क्रमांक १४३ मध्ये गंभीर प्रकार समोर आला आहे. काही मतदार जिवंत असतानाही त्यांना मयत दाखवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पूर्वेतील पेंडसे नगरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि युवा शाखाधिकारी अनुज मोरे यांनी डोंबिवली १४३ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत बीएलए १ प्रमोद कांबळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. कांबळे यांनी यासंदर्भात माहिती घेतली असता मतदारसंघात अशा अनेक मतदारांच्या बाबतीत हीच घटना घडल्याचे समोर आले.
हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास डळमळीत करणारा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी. जिवंत मतदारांची नावे कोणत्या आधारावर आणि कोणत्या प्रक्रियेनुसार वगळण्यात आली याची सविस्तर चौकशी करावी.
दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच ज्या मतदारांची नावे चुकीने वगळण्यात आली आहेत. त्यांची नावे तात्काळ मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये विविध शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे ही निवडणूक प्रशासनाची जबाबदारी आहे.
या गंभीर प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रमोद कांबळे यांच्यासोबत शाखाप्रमुख तथा यादी क्रमांक २३९ चे बीएलए हेमंत गिमावकर आणि युवा शाखाधिकारी तथा यादी क्रमांक २४१ चे बीएलए अनुज मोरे उपस्थित होते.