अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य  File Photo
ठाणे

धक्कादायक ! शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने वसतिगृहातच घेतला गळफास

विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

तलासरी (ठाणे) : शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तलासरीत घडली आहे. वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. तलासरी तालुक्यातील गिरगाव शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याच्या दुर्दैवी घटनेने वस्तीगृहातील इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर घटनेबाबत तलासरी पोलीस तपास करत आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणार्‍या तलासरी तालुक्यातील दुर्गम, निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या गिरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शासकीय आश्रम शाळा आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या 583 असून त्यापैकी 174 मुली आणि 175 मुले वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहेत.

या आश्रमशाळेतील इयत्ता नवीवीत शिकणार्‍या पल्लवी शरद खोटरे हिने दुपारच्या सुमारास शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी डहाणू तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी होती. विशेष म्हणजे ही विद्यार्थिनी घरून आजच शाळेत आली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी तिला वस्तीगृह आणि शाळेत सोडल्यानंतर वर्गात बसली होती. तब्येत बरी नसल्याचे कारण दिल्याने वर्गातील दोन मुलींनी आराम करण्यासाठी वसतिगृहात दुपारच्या सुमारास आणून सोडले. मात्र पहिल्या मजल्यावर कुणी नसल्याचं पाहत मुलीने टोकाचे पाऊल उचलत वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अस्पष्ट असेल तरी वस्तीगृहातील शिक्षण घेणार्‍या मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांसह मुलींचे वसतिगृहात शिक्षण घेत असताना समुपदेशन होणे आवश्यक आहे.

सध्या लहान मुलांपासून प्रौढ अवस्थेमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता व मानसिकता राहिली नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. शिवाय कौटुंबिक वाद तसेच शैक्षणिक तणाव मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी विद्यार्थी जीवनयात्रा संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने घेतलेल्या जीवनयात्रा संपवल्याच्या दुर्दैवी घटनेने मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग चिंतेत असून पालक कर्मचारी वर्गाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT