अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजपा थेट लढत! pudhari photo
ठाणे

Ambarnath Muncipal Election : अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजपा थेट लढत!

उबाठा, मनसे युती ठरणार शिवसेनेला डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या प्रतिष्ठेच्या नगरपालिकेमध्ये 59 जागांसाठी 169 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी बाराजणांनी अर्ज दाखल केले. तर बदलापूरमध्ये 49 जागांसाठी शंभरपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षांतर्फे पाच उमेदवारांनी तर सात अपक्षांनी अर्ज भरले आहेत. मात्र येथे सत्तारूढ भाजप शिवसेनेत खरी लढत आहे. बदलापूरमध्येही शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

थेट जनतेमधून होणाऱ्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे या तिन्ही पक्ष्यांची युती झाल्याने व मनसे चे सर्व उमेदवार मशाल चिन्हावर लढणार असल्याने शिवसेनेसाठी ही युती डोकेदुखी ठरणार आहे.

देशात व राज्यात शिवसेना व भारतीय जनता पार्टीची युती असली तरी शेवटच्या क्षणाला अंबरनाथ मध्ये युतीची बोलणी फिस्कटली. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक स्वबळावर लढली जात असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेत 1995 पासून शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मात्र आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच रंजक होणार आहे.

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना उमेदवारी दिल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा गट नाराज झाला होता. मात्र मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली मध्यस्थी व दिलेले आदेश, यामुळे आमदार डॉ. किणीकर यांनी पक्ष आदेश मान्य करण्याचे ठरवले आहे.मात्र तरीदेखील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. तर भाजपाने गुलाबराव करंजुले पाटील यांची सुनबाई तेजश्री यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्याने नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

पालघर जिल्ह्यात 94 नगरसेवकपदांसाठी 466 अर्ज; 4 नगराध्यक्ष पदांसाठी 34 जणांचे नामनिर्देशनपत्र दाखल

पालघर : पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण चार नगराध्यक्ष पदासाठी एकूण 34 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असून नगरसेवकपदांच्या एकूण 94 जागांसाठी 466 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्दशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्ष, अपक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांकरिता नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. पालघर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 नामनिर्देशन पत्र आणि नगरसेवक पदांच्या 30 जागांसाठी 172 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.

डहाणू नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 5 नामानिर्देशन पत्र आणि नगरसेवकपदांच्या 27 जागांसाठी 83 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. जव्हार नगरनगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 8 नामनिर्देशन पत्र आणि नगरसेवक पदांच्या 20 जागांसाठी एकूण 110 नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत. वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 10 नामनिर्देशन पत्र आणि नगरसेवक पदांच्या 17 जागांसाठी एकूण 101 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.

उबाठामध्ये शहरप्रमुख नाराज!

उबाठाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अंजली राऊत यांना दिल्याने इच्छुक असलेल्या शहर प्रमुख अजित काळे नाराज झाले आहेत. त्यामुळे आपण नगरसेवक निवडीसाठी काम करणार आहोत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी काम करणार नसल्याने काळे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. काळे यांच्या सोबत पश्चिम भागातील शहर प्रमुख संदीप पगारे यांनी देखील नाराज होऊन नगरसेवक पदाचा फॉर्म भरला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता उबाठातील ही नाराजी कुणाच्या पथ्यावर पडते. पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बदलापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष मोठ्या फरकाने विजयी होईल ः खा. डॉ. श्रीकांत शिंदे

बदलापूर : बदलापूर कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी शिवसैनिक आणि बदलापूरकरांमध्ये असलेला उत्साह पाहून कुळगांव बदलापूर नगरपालिकेवर शिवसेनेचे असलेली एक हाती सत्ता कायम राहून भगवा झेंडा डौलाने फडकत राहील असा विश्वास शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे बदलापुरात आले होते. त्यावेळेस त्यांनी माध्यमांची संवाद साधताना बदलापूर नगरपालिकेवर शिवसेना याची सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या बदलापूरमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर नगरपालिकेला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे आज बदलापूर शहरातील विस्तृत रस्ते, भव्य प्रशासकीय इमारत, अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन यासह विविध विकास कामे झाली आहेत. बदलापूर शहरातील सुशिक्षित , सुसंस्कृत व नोकरदार वर्ग मोठा असून आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावरचं बदलापूरकर आम्हाला कौल देतील असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी केणीकर, शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून मनीषा वाळेकर, भाजपच्या तेजश्री करंजुले -पाटील, उबाठा गटाच्या अंजली राऊत तर काँग्रेसकडून नूतन प्रदीप पाटील आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अश्विनी पाटील यांनी सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पॅनल पद्धतीने होत असून एकूण 29 पॅनल मध्ये 28 प्रभाग हे द्विसदस्य पद्धतीचे तर पॅनल क्रमांक 4 हा त्रिसदस्य पद्धतीचा आहे. या 29 पॅनल मधून 59 सदस्यांचे भवितव्य ठरणार आहे. एकूण 2 लाख 52 हजार 725 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2 डिसेंबर रोजी अंबरनाथमध्ये मतदान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT