ठाणे : ठाकरे बंधूंच्या मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यानंतर त्यासंदर्भातील प्रतिक्रिया सर्वत्र उमटायला सुरुवात झाली असून ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना डिवचणारा बॅनर ठाण्यातील टेभी नाका परिसरात लावण्यात आला आहे.
बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले असून बाजूला मुंबई महापौरांची खुर्ची आणि मुंबई महापालिकेची तिजोरी दाखवण्यात आली आहे.हा बॅनर लावण्यात आल्यानंतर या बॅनरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर पोलीस बळाचा वापर करून हा बॅनर काढण्यात आला.
हिंदी सक्तीचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा मुंबईत झाला. या विजयी मेळाव्याला मराठी माणसांचा अभूतपूर्व असा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर आता सर्वच ठिकाणी या विजयी मेळाव्यानंतर बॅनरबाजीला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिला असलेल्या ठाण्यातही सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना डिवचणारा बॅनर लावण्यात आला. युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे आणि निखिल बुडजडे यांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. 'मराठी माणसांची एकजूट अशीच राहूद्या ' या वाक्यांच्या मागे उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. तर बाजूला मुंबई महापौरांची आणि मुंबई महापालिकेची तिजोरी दाखवण्यात आली आहे. मात्र या बॅनरवरून शिंदेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तणाव निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी आधीच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर ठाणे महापालिकेच्या वतीने बॅनर काढण्याचा प्रयन्त केल्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना कडाडून विरोध केला. यामध्ये पोलीस आणि कारकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. अखेर पोलीस बाळाचा वापर करून हा बॅनर काढण्यात आला.
मराठी माणसांसाठी केवळ एकनाथ शिंदे हेच लढले असून उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केले असा प्रश्न यावेळी युवासेनेच्या वतीने विचारण्यात आला. आता मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आठवला आहे. या बॅनरच्या माध्यमातून आम्ही सत्य परिस्थिती मांडली असल्याचे युवासेनेच्या वतीने सांगण्यात आले.
शिंदेच्या युवासेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना डिवचणारा बॅनर लावण्यात आला असला तरी यामध्ये राज ठाकरे यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करण्यात आली नाही. याउलट राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी विषयीच मुद्दे मांडले असल्याचे सांगत राज ठाकरे यांना त्रास देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनीच केले असा आरोपही यावेळी युवासेनेच्या वतीने करण्यात आला.