शहापूर : शहापूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर दरम्यान नदीत पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करणे शक्य होईल. परिणामी शासनाचा टँकरवरील लाखो रुपयांचा खर्चही वाचू शकेल असे मत पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता पांढरे यांनी व्यक्त केले.
अधिकृत माहितीनुसार सध्या शहापूर तालुक्यात एकूण 18 टँकरच्या माध्यमातून 13 गावे व 69 पाडे अशा एकूण 72 गाव-पाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामपंचायत नांदवळ, गेगांव परिसरातील गाव-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नदीमधील पाण्याच्या उद्भव स्त्रोत आटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
नांदवळ, गेगांव, शिळ, शेलवली, अल्याणी, कळगांव व दहीवली या परिसरातील अनेक गावांजवळ नदी असूनही त्या ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आटल्याने गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे काळू नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
शहापूर तालुक्यातील अदिवली धरण, वेहळोली बंधारा, खराडे डॅम तसेच मुरबाड तालुक्यातील खांडपे व पाडाळे डॅममधून अतिरिक्त पाणी सोडल्यास नदीत पाणी उपलब्ध होऊन परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळू शकतो. अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
नदीत पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करणे शक्य होईल. त्यामुळे शासनाचा टँकरवरील लाखो रुपयांचा खर्चही वाचण्यास मदत होणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाण्याचे स्रोत आटल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच काळू नदीत पाणी सोडण्याबाबत ग्रामस्थांनी केलेली मागणी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली असून संबंधित धरणांमधून पाणी सोडण्याबाबत तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्यात येईल.विजया पांढरे, उपअभियंता पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती शहापूर