Shahapur road condition pudhari photo
ठाणे

Shahapur road condition : शहापूर-किन्हवली पुलाखालील खड्डे पोलिसांनी भरले

कर्तव्यनिष्ठ पोलिसांचे प्रेरणादायी कार्य; संबंधित यंत्रणा मात्र गाढ झोपेत

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : राजेश जागरे

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणांची असतांना शहापूर-किन्हवली मार्गावरील पुलाखालील धोकादायक खड्डे चक्क पोलिसांनी स्वतः माती टाकून भरल्याची घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ज्या पोलिसांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षित वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांनाच आता रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी फावडे हातात घ्यावे लागत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहापूर-किन्हवली मार्गावरील पुलाखालील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे धोकादायक ठरत असून अपघाताची शक्यता वाढली होती.

रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसी विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी साईनाथ बरफ, अनंता किरकिरे व पवन मुसळे आदींनी पुढाकार घेत या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती टाकून ते बुजविण्याचे काम केले.

पोलिसांचा हा उपक्रम केवळ खड्डे भरण्यापुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या सुरक्षेप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता व कर्तव्यनिष्ठा अधोरेखित करणारा आहे. एकीकडे रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग, अधिकारी आणि निधी उपलब्ध असतांना दुसरीकडे पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे भरावे लागत असतील, तर संबंधित यंत्रणा काय करत आहे. असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. खड्डे पडल्यावर दुरुस्तीऐवजी एखादा अपघात होण्याची वाट पाहिली जाते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पुढाकार

पोलिसांनी केलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत असले तरी हे चित्र संबंधित प्रशासनासाठी आत्मपरीक्षण करणारे आहे. ज्यांच्या हातात कायद्याची जबाबदारी, त्यांनी फावडे हाती घेतले आणि ज्यांच्या जबाबदारीत रस्त्यांची देखभाल, ते मात्र कुठे आहेत. हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. रस्त्यावरील खड्डे भरणे हे पोलिसांचे नियमित कर्तव्य नसतांनाही नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी घेतलेला पुढाकार खऱ्या अर्थाने जनसेवेचा आदर्श ठरला आहे. संबंधित विभागाने आता या रस्त्याची तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजविणे हे पोलिसांचे काम नसतांना नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी पोलिसांना फावडे हाती घ्यावे लागणे ही संबंधित यंत्रणेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ज्या विभागाकडे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी आणि निधी उपलब्ध आहे, त्या यंत्रणेने आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांना हे काम करावे लागले. पोलिसांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असून त्यांना सलाम आहे.
राजकुमार लहू बसवंत, सामाजिक कार्यकर्ते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT