शहापूर (ठाणे) : राजेश जागरे
शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली 548 ए या रस्त्याचे काम 2018 जानेवारीपासून सुरू आहे. मात्र या रस्त्यात गेलेल्या जमिनींचे भुसंपादन न करता व संबंधित शेतकर्यांना त्याचा मोबदला न देता सदर रस्ता थेट सुरू केल्याने बाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत तर या प्रलंबित रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवाशी व वाहन चालक हतबल झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते मुरबाड या राज्य मार्गाचे भारत सरकारने दर्जान्नत्ती करून तो राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 अ मुंबई-नाशिक हायवेला शहापूर येथे, मुंबई-नागपूर समृद्धी हायवेला खुटघर येथे, कल्याण औरंगाबाद निर्मळ रस्त्यास मुरबाड येथे, मुंबई-पुणे हायवेला खोपोली येथे तर मुंबई-गोवा हायवेला वाकण येथे जोडला जातो, असा हा अतिमहत्वाचा महामार्ग आहे.
शहापूर-मुरबाड-पाटगाव - खोपोली या 548 ए महामार्गावरील गोठेघर, बामणे, सापगाव, खुटघर, दोनघर, नडगाव (जा), शेंदुण बु, शेदुण खुर्द, ठिले, दहिवली व कळगाव येथील रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला ज्या शेतकर्यांच्या जमिनी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता काम सुरू केले आहे. सदर रस्त्यालगत वरकस व खरीप अशा दोन्ही स्वरूपाच्या जमिनी आहेत. या जमिनीमधून जुन्या रस्त्यासाठी 9 मीटर जागा संपादन करण्यात आली होती. परंतु आता नवीन रस्त्याच्या रूंदीकरणासाठी 17 मिटर जागा भुसंपादीत करण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही बाजू मिळून 30 मिटर एवढी जागा संपादित करण्यात येत आहे. या संदर्भात शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची माहिती किंवा नोटीस दिली नाही. शिवाय त्या जागेचा मोबदलाही दिला नाही. तसेच या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा सर्व्हे केला नसून शेतकर्यांच्या जमिनी घेऊन रस्त्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप बाधित शेतकरी तुकाराम दुर्गे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीसमोर बोलतांना केला आहे. तथापि दप्तरी असलेली शहापूर-लेनाड - मुरबाड रस्ता नोंद भूसंपादन झालेल्या 9 मीटर प्रमाणे केली नाही.
भूसंपादन झालेले क्षेत्र हे शेतकर्यांच्या 7/12 मधून जास्त प्रमाणात संपादन केले आहे. प्रत्यक्ष रस्त्याकामी गेलेले क्षेत्र व शेतकर्यांच्या 7/12 मध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्राची तफावत दिसून येते. सदर तफावत सरकारी मोजणी करून दूर करणे क्रमप्राप्त असताना तसे केले नसल्याचे खुटघर येथील बाधित शेतकरी अनंता बसवंत यांनी सांगितले.
भूसंपादन कायद्याचे पालन व्हावे - या महामार्गावरील शहापूर-कळगावपर्यंत जे क्षेत्र बाधीत झाले आहे, त्यास आमचा विरोध नसून शेती व रस्ता यांच्यामधील अंतर खूप उंच असून आम्हाला त्या क्षेत्राचा मोबदला सरकारी नियमाप्रमाणे मिळावा. तसेच आमची काही भातशेतीही रस्त्यालगत असून ट्रॅक्टरसह आमच्या पशुधनाला जाण्या-येण्यासाठी रस्ता करून द्यावा. तसेच सदर रस्त्याला आमचा अजिबात विरोध नाहीच. मात्र भूसंपादन कायदा 1894 च्या कलम 4 व 6 अन्वये भूसंपादीत झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना मिळावा, अशी मागणी आहे.मारुती भालके, शेतकरी