आसनगाव : शहापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणार्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहापूर शहर तसेच तालुक्यातील वासिंद, कसारा, किन्हवली, डोळखांब, खर्डी या प्रमुख बाजारपेठा ओस पडल्या आहेत. गणपती व गौरी सणाच्या खरेदी साठी बाहेर पडणारे नागरिक अतिवृष्टीमुळे घरी असल्याने व्यापारी वर्गाची चांगलीच हिरमोड झाली आहे. सुरक्षिततेसाठी घराबाहेर न पडता प्रशासनाच्या सूचनांचे पालन शहापुर तालुक्यातील नागरिकांनी केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. यासोबतच तहसील कार्यालयातून आदेश काढून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी व खासगी आस्थापना दुपारनंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा धरण क्षेत्रातील नदीकाठी राहणार्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
अचानक वाढणारा पाणीप्रवाह आणि सततची पावसाची संततधार लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून नदीकाठच्या गावांत प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परमेश्वर कासुळे, शहापूर तहसीलदार