Shahad Railway Flyover pudhari photo
ठाणे

Shahad Railway Flyover : शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात

३२५.९३ कोटींच्या प्रकल्पातून शहाड येथे दोन नवीन पूल उभारणार

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणाऱ्या शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि या प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांतून शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुमारे ३२५.९३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून सध्याच्या जुन्या आणि अरुंद पुलाला पर्याय म्हणून दोन नवीन दोन पदरी पूल उभारण्यात येणार आहेत.

त्यामुळे कल्याण, उल्हासनगर तसेच मुरबाडच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्‍ये सध्याचा जुना पूल हा टप्प्याटप्प्याने पाडून त्याच जागी आणखी एक नवीन दोन पदरी पूल उभारण्यात येईल. यामुळे वाहतूक सुरळीत राहील.

शहाड रेल्वे स्थानकाजवळील सध्याचा रेल्वे उड्डाणपूल सुमारे ४० वर्षे जुना असून, केवळ दोन पदरी असल्याने या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. कल्याण आणि उल्हासनगर या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि अहमदनगरच्या दिशेने ये-जा करणारी अवजड वाहनेही याच पुलाचा वापर करतात.

दोन्ही बाजूंना रुंद रस्ते असतानाही पुलावर अचानक रुंदी कमी होत असल्याने वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण होतो. वाढती वाहनसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या पुलाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. टिटवाळा-बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि बळकटीकरण या प्रकल्पांतर्गत शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, संपूर्ण प्रकल्पासाठी ३२५.९३ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १९९.२१ कोटी रुपये स्थापत्य कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

प्रकल्प ठरणार महत्त्वाचा

विशेषतः मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने कल्याण-उल्हासनगरमधील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कल्याण आणि उल्हासनगर या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमधील वाढती वाहनसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT