ठाणे : दुर्गम डोंगर-दऱ्या, आदिवासी पाडे आणि मर्यादित संसाधनांच्या पार्श्वभूमीवर कुपोषणाची समस्या दीर्घकाळ भेडसावत असलेल्या ठाणे जिल्ह्यात आता दिलासादायक बदल दिसू लागला आहे. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली असून कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
सन 2023 मध्ये 148 असलेली तीव्र कुपोषित बालकांची संख्या आता 54 वर आली आहे. विशेषतः शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात ही समस्या अधिक गंभीर होती. अपुरी पोषणमूल्ये, आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी, आर्थिक मर्यादा आणि जागरूकतेचा अभाव ही कुपोषणामागील प्रमुख कारणे होती.
मात्र, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या समस्येला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंगणवाड्यांमार्फत पूरक आहार, बालकांचे नियमित आरोग्य परीक्षण, गर्भवती व स्तनदा मातांची काळजी, तसेच ‘स्मार्ट अंगणवाडी’ आणि ‘स्मार्ट आरोग्यकेंद्र’ उपक्रमांमुळे सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या.
याशिवाय ग्रामपातळीवर जनजागृती, पोषण आहार स्पर्धा, माता-बाल संगोपन कार्यशाळा आणि घरपोच आरोग्य सेवा यामुळे स्थानिक सहभाग वाढला आहे. दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचून बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्याने कुपोषणाचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.
कुपोषणाची समस्या नियंत्रणात
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात यंदा महिला व बालकल्याण विभागासाठी 4.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुपोषण निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले आहे. या माध्यमातून पोषणविषयक योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुपोषणाची समस्या पूर्णतः संपलेली नसली तरी ती नियंत्रणात आणण्याच्या दिशेने ठाणे जिल्हा पुढे जात असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.