डोंबिवली : अर्धवेळ नोकरीचे अमिष दाखवत ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून काही भामट्यांनी डोंबिवलीतील विविध भागात राहणाऱ्या सात जणांची एकूण 70 लाख 77 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात फसवणूकीचा प्रकार घडला. फसगत झालेले नोकरदार/व्यावसायिक असून ते पलावा, मानपाडा रोडला असलेल्या सांगाव, देसलेपाडा, स्टार कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांसह सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
यातील एका गुंतवणूकदाराची तब्बल 43 लाखांहून अधिक रक्कम, तर इतरांच्या लाखात रकमा भामट्यांनी उकळल्या आहेत. एका नोकरदार तक्रारदाराच्या पुढाकाराने 7 जणांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. शिवाय सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडेही फसगत झालेल्यांनी तक्रारी केल्या आहेत.
मूळ रक्कम परत मागण्याचा तगादा गुंतवणूकदारांनी भामट्यांकडे लावला. गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत करण्यास भामटे टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर गुंतवणूकदारांनी सायबर गुन्हे अन्वेषण विभागासह मानपाडा पोलिस ठाण्यात कागदोपत्री पुराव्यांसह तक्रार दाखल केली. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.