ठाणे

कागद पत्रांसाठी सामान्य नागरिकांना नाचवू नका, तत्परतेने सेवा द्या नितीन गडकरी यांनी उपटले बँक कर्मचाऱ्यांचे कान

अमृता चौगुले

डोंबिवली, भाग्यश्री प्रधान आचार्य : वेळेत निर्णय घेण्याची क्षमता कर्मचाऱ्यांमध्ये असणे आवश्यक असून सामान्य नागरिकांना कागदपत्रांसाठी दहा वेळेला नाचवू नका. कोणते कागदपत्र हवे आहेत ते एकदाच सांगा आणि काम होणार की नाही हे देखील त्यांना त्वरित सांगा म्हणजे त्यांचा वेळ खर्ची होणार नाही अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण येथील एका बँकेच्या कार्यक्रमात बँक कर्मचाऱ्यांना दिली.

कल्याण जनता सहकारी बँकेचा 50 वा वर्धापन दिन कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे साजरा झाला या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले होते. यावेळी संचालक मंडळ, कर्मचारी याना प्रामाणिक माणसांचा अंदाज येतो. जो व्यवसाय करतो त्याला कळत की कसा त्रास होतो. तीन चार महिने हे पत्र द्या ते पत्र द्या अशी मागणी होत असते शेवटी तो माणूस कंटाळतो एवढ्या कागदपत्रांची खरच गरज असते का असा सवालही त्यांनी केला. यावेळी प्रेक्षकांमधून देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पहायला मिळाले.

यावर उपाय म्हणून यंत्रणा डिजिटल करा असा सल्ला देखील त्यांनी बँकांना दिला. या भाषणात त्यांनी दिल्लीच्या प्रदूषणाचा उल्लेख करत या प्रदूषणमुक्तीसाठी 2004 पासून प्रयत्न करत असल्याचे त्यानी नमूद केले. संपूर्ण देशात इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर सुरू झाला पाहिजे सर्वच राज्याने डिझेल पेट्रोलचा वापर बंद केला पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी काम करताना मी कोणत्याही बजेटवर अवलंबून राहत नाही. मी नागरिकांकडून पैसे घेतो आणि त्यांना ते व्याजासकट परत करतो असे सांगताना हिंदूस्थानचे इन्फ्रास्टक्चर मी गरीब माणसाच्या पैशातून उभे करायचे ठरवले आहे हे नमूद केले. रिटायर्ड, चपरासी, कॉनस्टेबल, पत्रकार आणि नोकरी करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या पैशातून रस्ते बांधून त्यांचे पैसे त्यांना व्याजासकट परत देईन असे सांगताना मला 3 लाख कोटी रुपये लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

माझ्या काळात झालेला पुणे-मुंबई राष्ट्रीय रस्ता सरकारने तीन महिन्यापूर्वी विकला आणि 8 हजार कोटी रुपये मिळविले. यामुळे रस्त्याचा खर्च तर निघालाच शिवाय पुढील कामासाठी पैसे देखील मिळाले. ग्लोबल इकोनॉमी मध्ये अनेक राष्ट्र भारताकडे फार अपेक्षेने बघतात. ज्या देशांनी प्रगती केली आहे. त्या देशांशी व्यवहार करण्यासाठी ही राष्ट्रे उत्सुक नाहीत. त्यांना भारताबरोबरच व्यवहार करायचा आहे. आपल्या संस्कृती मुळे ते आपल्यावर अधिक विश्वास टाकतात असे देखील त्यांनी सांगितले.

सहकारी बॅंकांची सक्सेस स्टोरी केवळ महाराष्ट्र आणि गुजरापुरती सिमीत आहे. उत्तर प्रदेश बिहार बंगाल अशा अनेक राज्यात सहकार चळवळ नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही इतर राज्यांसाठी ठसा निर्माण करणारी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ती स्विकारली आहे. मध्यंतरी एक दोन बॅकांच्या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बॅंक सगळ्याच सहकारी बँकांबद्दल वेगळाच विचार करु लागली होती. त्यावेळी मी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरला भेटून समजूत काढली होती.

आर्थिक गोष्‍टीत सक्षम व्हायचे असेल तर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहीजे. युथ टॅलेंटेड इंजिनिअर मॅन पॉवर जर कोठे असेल तर ती हिंदूस्थानात आहे. यासाठी परफेक्शन देखील महत्त्वाचे असून अनुभवातून आणि सरावातून ते निर्माण होणे गरजेचे असल्याचा संदेश त्यानी दिला. ग्लोबल इकॉनॉमिमध्ये तुमची स्पर्धा ही तुमची इच्छा असो वा नसो जागतिक बॅंकांशी होणार आहे. नागरिक बाहेरील बॅंकामधून कर्ज काढत असून हे छोट्या बँकांसाठी आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

.हेही वाचा

SCROLL FOR NEXT