arrest File Photo
ठाणे

Chhatrapati Sambhajinagar gang arrested Samruddhi Mahamarg robberies|समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी संभाजीनगरची टोळी जेरबंद

आमने टोलनाक्याजवळ पिस्तूल लावून अभियंत्याला लुटले होते

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शासकीय कार्यकारी अभियंत्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना पिस्तूलचा धाक दाखवत ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल दरोडेखोरांनी लुटल्याचा प्रकार समोर आला. गाडीसोबत चालकाचे अपहरण करू टोळी फरार झाली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणाचा छडा लावत कल्याण तालुका पोलिस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छत्रपती संभाजीनगर भागातून तेथील पोलिसांच्या मदतीने पाच आरोपींना अटक केली आहे.

आकाश मर्दनसिंग उसारे (२३, रा. लाडसावंगी), गोपाल कमलालाल बनमावत ऊर्फ राजपूत (२४), लहू जयसिंग बारवार (१८), दुर्गेश ताराचंद फटपुरे (२४) आणि आकाश बाबुलाल शेवाळे (२१) अशी आरोपींची नावे आहेत.

मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता खान अब्दुल फरीद अब्दुल हामिद हे सोमवारी आपल्या इनोव्हा वाहनातून चालकासह छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६११ येथे आले असता एम. एच. २० एचएन ६३७७ क्रमांकाच्या इटिंगा वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.

फळेगाव-विरुद्धपाडा परिसरातील गुरवली एक्स्प्रेसवेच्या शेवटच्या बिंदूजवळ आरोपींनी अभियंत्याचे वाहन अडवले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून त्यांना वाहनातून खाली उतरवले आणि जबरदस्तीने स्वतःच्या इटिंगा गाडीत बसवले. आरोर्पीनी अभियंत्याला ताब्यात घेत त्यांच्या जवळील ३० हजार रुपये आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या चालकाला इगतपुरी येथील चॅनल क्रमांक ६१५ जवळ, घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर सोडून दिले. लूटमार करून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेनंतर कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास सुरू केला. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून आरोपींचा माग काढत पोलिसांचे पथक थेट छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने अगोदर आकाशला टीव्ही सेंटर भागातून बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याचे चार साथीदारही जेरबंद केले. या कारवाईत कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय डाखोरे, ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दादासो एडके यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कल्याण तालुका ठाण्याचे जमादार पी. ए. बडगे यांचाही तपासात सहभाग होता.

महामार्गावरील गस्तीचा प्रश्न ऐरणीवर

समृद्धी महामार्गावर भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून शासकीय अभियंत्याला लुटणे, चालकाचे गाडीसह अपहरण झाल्याने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनांचा पाठलाग करून प्रवाशांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार गंभीर आहे. महामार्गावर नियमित पोलीस गस्त, प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT