Dombivli Railway Incident Pudhari
ठाणे

Dombivli Railway Incident: डोंबिवली स्टेशनवर काळजाचा ठोका चुकविणारी घटना; धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्धाचा जीव धोक्यात

जीआरपी जवान अनिल शेळके यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय पंडित वाघ यांचा तोल गेल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अनिल शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीला धाव घेतल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

ही संपूर्ण घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पंडित वाघ हे रात्रीच्या सुमारास धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते.

यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते प्लॅटफॉर्म आणि चालत्या लोकलमधील धोकादायक फटीत अडकण्याच्या स्थितीत आले. काही क्षणांसाठी त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. याचवेळी तेथे कर्तव्यावर असले डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी वयोवृद्ध पंडित वाघ यांना सुरक्षितपणे बाहेर खेचत त्यांचे प्राण वाचवले. अनिल शेळके यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पंडित वाघ यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अनिल शेळके यांचे आभार मानले.

या थरारक प्रसंगाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, अनिल शेळके यांच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT